बायणा दरोडा प्रकरण : घरातील कामगारच 'मास्टरमाईंड' : पोलीस महासंचालक आलोक कुमार

गुन्हे रोखण्यासाठी नाकाबंदी वाढवली; कामगार-भाडेकरू पडताळणीबाबत जनजागृती करणार

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
बायणा दरोडा प्रकरण : घरातील कामगारच 'मास्टरमाईंड' : पोलीस महासंचालक आलोक कुमार

पणजी: बायणा दरोडा प्रकरणातील 'मास्टरमाईंड' हा त्याच कुटुंबाच्या दुकानात कामाला होता. भविष्यात असे गुन्हे रोखण्यासाठी गोवा पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यानुसार नाकाबंदी वाढवण्यात आली असून, भाडेकरू आणि कामगारांच्या पडताळणीबाबत लोकांमध्ये जागृती केली जाईल, अशी माहिती पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली. गुरुवारी पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर, टिकम सिंग वर्मा व अन्य अधिकारी उपस्थित होते.

आलोक कुमार यांनी सांगितले की, बायणा दरोडा प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. सर्व संशयित हे ओडिशाचे रहिवासी आहेत. गोवा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने संशयितांना कल्याण आणि भिवंडी परिसरातून अटक केली. यामध्ये आणखी एका संशयिताचा सहभाग असण्याची शक्यता असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

दरोडेखोरांनी चोरलेला बहुतेक मुद्देमाल परत मिळाला आहे. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि भांड्यांचा समावेश आहे. पोलिसांनी चोरीच्या ठिकाणी मिळालेला मास्क, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक सर्व्हिलन्स आदी गोष्टींचा वापर करून या प्रकरणाचा छडा लावला.

ते पुढे म्हणाले, बायणा प्रकरणी कुटुंबीयांनी चोरीचा 'मास्टरमाईंड' असलेल्या कामगाराची पडताळणी केली नव्हती. अनेक लोक आपल्या भाडेकरूची किंवा कामगाराची पडताळणी करत नाहीत. यामुळे अशी घटना घडल्यास गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी वेळ लागतो. सर्वांनी आपले भाडेकरू तसेच कामगारांची पडताळणी करणे आवश्यक आहे. पोलीस आणि सामान्य जनतेत संवाद असावा, म्हणून विविध उपाययोजना आहेत. यापुढे त्या अधिक प्रभावीपणे राबवल्या जाणार आहेत, तसेच रात्रीच्या वेळी नाकाबंदी देखील वाढवली जाणार आहे. दरम्यान पत्रकारांनी पूजा नाईकने केलेल्या दाव्यांसंदर्भात प्रश्न विचारले असता चौकशी अंतिम टप्प्यात आहे. तसेच तिने केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

ग्रँड व्हिटारा जप्त

सांताक्रूझ चोरी प्रकरणी लोकेश सुतार (वय ३१, महाराष्ट्र) याला अटक करण्यात आली आहे. या चोरीच्या पैशांतून त्याने विकत घेतलेली ग्रँड व्हिटारा गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी चोरण्यात आलेले सोने सोनारांना विकले असून, ते देखील लवकरच परत मिळवले जाईल असे, पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर यांनी सांगितले. 

हेही वाचा