
म्हापसा: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहाजवळ छापा टाकून पोलिसांनी सुमारे ५.५० लाख रुपये किमतीचा ५ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी गोविंद रामेश्वरकुमार रंगी (१९, मूळ रा. बिलासपूर, राजस्थान) या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारी ११.४० ते २ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. कोलवाळ कारागृहाजवळील राष्ट्रीय महामार्गावर ड्रग्जची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीला प्रवासी बसमधून उतरताच ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याजवळ गांजा आढळून आला.
या संदर्भात संशयिताविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी बजावली. पुढील तपास सुरू आहे.