
मडगाव: कोटपा कायद्याचे उल्लंघन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी सासष्टी तालुका अंमलबजावणी पथकाने मडगाव परिसरातील गाडे आणि स्टॉल्सची तपासणी केली. या मोहिमेत कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मामलेदार रोहन पेस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने फातिमा कॉन्व्हेंटजवळ तपासणी केली असता, शाळा परिसराच्या १०० यार्डांच्या आत सिगारेट, तंबाखूचे पाऊच, बिडी आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले.
या तपासणीदरम्यान कोटपा कलम ४ आणि ६(अ) च्या उल्लंघनासाठी एकूण ५ दुकानांना चलन जारी करण्यात आले आणि त्यांच्याकडून २००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संजय वेळीप, गोवा कॅनचे सचिव लोर्ना फर्नांडिस यांच्यासह अन्य सदस्य या पथकात सहभागी होते.