
पणजी : शिरगाव श्री लईराई जत्रेत (Shirgao Shri Devi Lairaee Jatra) झालेल्या चेंगराचेंगरीचा तपास अहवाल सरकारला (Goa Government) सादर करण्यात आला आहे. या तपास अहवालावर कारवाई केली जाईल. गर्दी व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक योजना देखील सादर करण्यात आली आहे. नियोजनानुसार कामे सुरू होतील असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर माहिती दिली. पर्तगाळी मठ आपला ५५० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मठाचा ५५० वा वर्धापन दिन हा गोव्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ७७ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करतील.
हा कार्यक्रम जनतेसाठी खुला आहे. पणजीत भगवान श्री परशुरामांचा पुतळा आहे. आता दक्षिण गोव्यातील काणकोण येथे श्री रामाची मूर्ती उभारण्यात आली आहे. यामुळे राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
त्यानंतरच पूजा प्रकरणावर भाष्य
मला पूजा नाईक यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीबद्दल पोलिसांकडून माहिती मिळालेली नाही. "पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर मी या विषयावर बोलेन," असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
कामसूत्रासारख्या कार्यक्रमांना परवानगी नाही
सरकार कधीही ‘टेल्स ऑफ कामसूत्र’ सारखे कार्यक्रम आयोजित करू देणार नाही. सामाजिक संघटनांकडून निवेदन मिळण्यापूर्वीच सरकारने या कार्यक्रमावर बंदी घालण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. सरकारकडून परवानगी मिळण्यापूर्वी या कार्यक्रमाची जाहिरातही करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘टेल्स ऑफ कामसूत्र’ कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
सीईसी अहवाल पोचलेला नाही
व्याघ्र क्षेत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीचा (सीईसी) अहवाल सरकारपर्यंत पोहोचलेला नाही. अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच भाष्य करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.