राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आता इग्नूमधून घेता येणार उच्च शिक्षण

दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि इग्नू प्रादेशिक केंद्रात सामंजस्य करार

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आता इग्नूमधून घेता येणार उच्च शिक्षण

पणजी: राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून (इग्नू) दूरस्थ पद्धतीने उच्च शिक्षण घेता येणार आहे. याबाबत राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय, दिव्यांगजन सक्षमीकरण खाते आणि पणजी येथील इग्नू प्रादेशिक केंद्र यांच्यामध्ये सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.

या करारामुळे गोव्यात बारावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या, परंतु विविध आव्हानांमुळे पुढील शिक्षण सुरू ठेवू न शकलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

करारानुसार, अशा विद्यार्थ्यांना इग्नूद्वारे चालविण्यात येणारे विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास मार्गदर्शन आणि मदत मिळणार आहे. या सुविधेमुळे या विद्यार्थ्यांना घरूनच अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होणार आहे. इग्नूचे अधिकारी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया आणि उपलब्ध कार्यक्रम समजून घेण्यास मदत करतील, तसेच मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करणार आहेत.

याबाबत दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगितले की, इग्नूसोबतची ही भागीदारी गोव्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसाठी उच्च शिक्षण सर्वसमावेशक आणि सुलभ बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणींमुळे बारावीनंतर शिक्षण थांबवावे लागते. आता या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण सुरू ठेवण्याची, ध्येय साध्य करण्याची आणि अर्थपूर्ण करिअर घडवण्याची नवीन संधी मिळणार आहे.

पावसकर यांनी पुढे सांगितले की, आमचे कार्यालय प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला मार्गदर्शन करेल आणि आवश्यक प्रक्रियेत त्यांना पाठिंबा देईल. तसेच, पात्र विद्यार्थी दिव्यांगजन सक्षमीकरण खात्याच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतील. नावनोंदणी करू इच्छिणाऱ्या किंवा मदतीची आवश्यकता असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी महादेव सावंत- ९६३७८८८७६९/ ९१५६३२१९०० या क्रमांकावर अथवा [email protected] किंवा [email protected] येथे संपर्क साधावा, असे आवाहन पावसकर यांनी केले आहे.

हेही वाचा