कथेतून नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या स्त्रीच्या संघर्षाला उजाळा

‘घर’ चित्रपटातील एक दृश्य.
..
गोवन वार्ता
पणजी : भूतकाळातील वेदना मनात न बाळगता नवीन आशा आणि उमेद घेऊन पुढे कसे जायचे, याची संवेदनशील मांडणी ‘घर’ या कोकणी लघुपटातून करण्यात आली आहे. एका तरुण विधवेच्या जीवनावर आधारित ही कथा नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या स्त्रीच्या संघर्षाला उजाळा देते.
किशोर अर्जुन दिग्दर्शित ‘घर’ हा १९ मिनिटांचा लघुपट सत्य घटनेवर आधारित आहे. कथानकाची सुरुवात राजी या तरुण विधवेपासून होते. एक वर्षापूर्वी पतीच्या अपघाती मृत्यूनंतर ती सासू आणि लहान मुलासह संसार सांभाळते. अपघात विम्यामुळे आर्थिक अडचण नसतानाही राजी मनाने भूतकाळात अडकलेली असते. याच काळात सॅम नावाचा युवक तिला नवा संसार उभा करण्यासाठी प्रोत्साहन देतो; मात्र स्वतः लावून घेतलेल्या मर्यादांमुळे राजी निर्णय घेण्यास धजावत नाही. या द्वंद्वातून नव्या सुरुवातीचे धाडस कसे मिळते, यावर हा लघुपट आधारलेला आहे.
राजीची भूमिका साकारलेल्या रावीने प्रभावी अभिनय सादर केला आहे. विधवेचे एकाकीपण, चेहऱ्यावर दडलेले दुःख आणि भावनांचा संघर्ष तिने नजाकतीने मांडला आहे. नव्या जीवनाचा निर्णय घेतानाचा बदल तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या आत्मविश्वासातून प्रेक्षकांना जाणवतो. दिग्दर्शक किशोर अर्जुन यांनी समाजातील विधवेकडे पाहण्याच्या नजरेवर नेमके भाष्य केले आहे. सॅमचे प्रयत्न, विधवेभोवतीचा सामाजिक दडपणाचा पट, तसेच सासू–सुनेतील संवाद यामधून कथेला योग्य वजन देण्यात आले आहे.
एकूणच ‘घर’ लघुपट विधवेच्या पुनर्वसनाच्या विषयावर प्रकाश टाकतो. सकारात्मक दृष्टी असणाऱ्या समाजामुळे स्त्रीचे जीवन अधिक सुलभ होऊ शकते, हा संदेश या लघुपटातून प्रभावीपणे पोहोचवण्यात आला आहे.