पिकांचे नुकसान झाल्यास विमा योजना ठरणार महत्त्वाची

पाणी साचून व वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसानही योजनेत समाविष्ट; हेक्टरी ६६,७५० रुपये भरपाईची शक्यता

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
37 mins ago
पिकांचे नुकसान झाल्यास विमा योजना ठरणार महत्त्वाची

मडगाव: राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास सरकार शेतकरी आधार निधीतून मदत करते, त्याचप्रमाणे पंतप्रधान फसल विमा योजनेतून विमा घेतल्यास त्यातूनही आर्थिक भरपाई मिळू शकते. या योजनेत शेतात पाणी साचून झालेले नुकसान आणि वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान या गोष्टींचाही समावेश आहे, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हा कृषी अधिकारी राजेश प्रभुदेसाई यांनी दिली.

कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात पंतप्रधान फसल विमा योजनेसाठी 'ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स' या उपक्रमांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण दिले जात आहे. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक शिवराम गावकर, उपजिल्हा व्यवस्थापक रूपेश, आत्माचे दत्तात्रय पंडित, चंदन पेडणेकर आदी उपस्थित होते.

पावसाने झालेल्या नुकसानीवर भरपाई

राजेश प्रभुदेसाई यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे. दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काणकोण वगळता इतर भागातील शेतकऱ्यांच्या भातपिकाचे अधिक नुकसान झाले आहे. हेक्टरी ४० हजार रुपये या दराने शेतकरी आधार निधीतून भरपाई दिली जात आहे. सात तालुक्यांतील सादर झालेल्या अर्जांची पडताळणी करून शेतकऱ्यांना भरपाई दिली जात आहे. तसेच, कृषी कार्ड नसलेल्यांनाही या योजनेतून भरपाई दिली जाणार आहे.

या प्रशिक्षणात पंतप्रधान फसल विमा योजना आणि केंद्राच्या पीक विमा योजनेबाबत माहिती दिली जाईल. प्रशिक्षित तज्ज्ञांनी गावागावात जाऊन ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

योजनेचा लाभ घेणे आवश्यक

कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक शिवराम गावकर यांनी सांगितले की, कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण कायम सुरू असतात. यातून तांत्रिक ज्ञान, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजनांसाठी आत्माकृषी विज्ञान केंद्राकडून एकत्रित कार्य केले जात आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाचे नुकसान होत असून, या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकारकडून शेतकरी आधार निधी योजनेतून आर्थिक मदत केली जाते. फसल विमा योजना सध्या भात पिकासह इतर पिकांसाठी असून, त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. यामुळे शेतकरी आधार निधीसह पीक विम्यातूनही आर्थिक मदत मिळणार आहे.

हेक्टरी ६६,७५० रुपये भरपाई शक्य

फसल विमा योजनेत काही गोष्टी नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यात शेतजमिनीत पाण्याची साठवणूक झाल्यास पिकाचे नुकसान झाल्यास तसेच वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा रक्कमेसाठी दावा (Claim) केला जाऊ शकतो. बागायती पिकांसाठी अजूनही काही गोष्टी यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

शिवराम गावकर यांनी सांगितले की, पंतप्रधान फसल विमा योजनेंतर्गत एका हेक्टरसाठी ६६,७५० रुपये एवढी किंमत केली जात असून, यासाठी शेतकऱ्याला केवळ १३३५ रुपये भरावे लागतील. उर्वरित ७३४ रुपये केंद्र व राज्य सरकारकडून भरले जातील. ज्याप्रमाणे घराचा, गाडीचा विमा आपण करतो, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी पिकांचा विमा केल्यास याचा फायदाच होणार आहे.

हेही वाचा