पोलिसांकडून कार जप्त : महाराष्ट्रातील दाम्पत्याकडून ५ हजार रुपये दंड वसूल

म्हापसा : स्थानिकांसह पर्यटकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या तोर्डा, साल्वादोर द मुंद येथील खाडीत (creek) कचरा (garbage) टाकणाऱ्या महाराष्ट्रातील दाम्पत्याला पर्वरी पोलिसांनी (Porvorim Goa Police) अद्दल घडविली आहे. या दाम्पत्याची कार जप्त केली असून पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुरुवार दि. २७ रोजी कारमधून आलेल्या एका दाम्पत्याने या खाडीच्या पाण्यात कचरा टाकला होता. हा प्रकार एका जागरूक नागरिकाने पाहिला व त्याने जाब विचारला असता, ते दाम्पत्य घटनास्थळावरून निघून गेले होते.
हा प्रकार सदर नागरिकाने आपल्या मोबाईलवर चित्रित केला होता. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची दखल घेऊन पर्वरी पोलिसांनी सदर कारगाडीसह नाशिक-महाराष्ट्र येथील दाम्पत्याची ओळख पटवली.
पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखाली पर्वरी पोलिसांनी शुक्रवार दि. २८ रोजी ही कार जप्त केली. तसेच कचरा टाकणाऱ्या व्यक्तीकडून ५ हजार रुपये दंड वसूल केला. पर्यटक कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
कारवाईनंतर उपरती
पोलिसांनी कारवाई केल्यानंतर खाडीत कचरा टाकणाऱ्याने आपली चूक मान्य केली. त्यानंतर खाडीच्या पाण्यात टाकलेला सर्व कचरा स्वत:हून बाहेर काढला आणि खाडीच्या पात्राची स्वच्छता केली.