
पणजी : वीज ग्राहकांना (Electricity Consumer) आता सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जात असलेल्या विजेचा भार उचलावा लागणार आहे. रस्त्यांवरील सार्वजनीक विजेच्या (Streetlight) दिव्यांचे शुल्क भरावे लागणार असून, यासंदर्भात वीज खात्याने (Goa Electricity Department) अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेनुसार १ ऑक्टोबरपासून रस्त्यांवरील दिव्यांचे शुल्क ग्राहकांना भरावे लागत आहे. वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडीस यांनी यासंदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, रस्त्यांवरील सार्वजनीक विजेच्या दिव्यांचे शुल्क ग्राहकांच्या विजेच्या बिलांतून वसूल केले जात आहे.
ग्राहक किती युनिट वीज वापरतात त्यावरून ग्राहकांची श्रेणी ठरविण्यात आली आहे. त्यानुसार ग्राहकांच्या वीज बिलातून रस्त्यांवरील दिव्यांचे शुल्क आकारले जात असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे. १ ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू झाले असल्याचेही त्यात नमूद केले आहे.
अधिसूचनेनुसार, ‘लो टेन्शन’ घरगुती वापरासाठी, ‘लो टेन्शन’ कृषी वापरासाठी प्रती युनिट ५ पैसे शुल्क आकारले जात आहे. इतर घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठी ८ पैसे युनिट प्रमाणे शुल्क आकारले जात आहे.
‘लो टेन्शन’ गट, कमी उत्पन्न गट व वीजेवरील वाहने चार्ज केली जात असलेल्या स्टेशनना अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. जेइआरसीने यापूर्वीच राज्यात वीज शुल्कात ४ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
चालू आर्थिक वर्ष ते २०२६ ते २७, २०२७ ते २८, २०२८ ते २९ व २०२९ ते ३० पर्यंत हे वाढीव शुल्क लागू असणार आहे. १ ऑक्टोबरपासून नवे वाढ शुल्क लागू होत असल्याचे जेइआरसीने अधिसूचनेत म्हटले आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केली आहे.