
पणजी: बंदी घातलेल्या एलईडी मासेमारी गियरचा वापर करून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याप्रकरणी महाराष्ट्र मच्छिमार खात्याच्या अधिकाऱ्यांनी गोव्यातील दोन मासेमारी ट्रॉलर जप्त केले आहेत. या कारवाईमुळे आंतरराज्यीय सागरी हद्दीच्या उल्लंघनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले हे दोन ट्रॉलर बार्देशमधील एका आमदाराच्या मालकीचे असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक नियमांचे उल्लंघन करून, विशेषतः सागरी जीवांना धोकादायक असलेले एलईडी गियर वापरल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

गोव्यानेही केली होती कारवाई
दरम्यान, यापूर्वी गोवा मत्स्य विभागानेही गोव्याच्या हद्दीत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली होती. अलीकडेच गोवा मच्छिमार खाते आणि किनारी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून महाराष्ट्र (रत्नागिरी) आणि कर्नाटक येथील एकूण १६ बेकायदेशीर मासेमारी ट्रॉलर जप्त केले होते. यापैकी रत्नागिरीतील १० ट्रॉलर कळंगूटजवळ कारवाई करून पकडण्यात आले होते.
मच्छिमार खात्याचे मंत्री हळर्णकर यांनी त्यावेळी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला होता. जप्त केलेले हे ट्रॉलर नंतर पुढील कार्यवाहीसाठी पणजीत मच्छिमार खात्याच्या जेटीवर आणण्यात आले होते. एकीकडे गोव्याने महाराष्ट्राच्या ट्रॉलरवर कारवाई केली असताना, आता महाराष्ट्राने गोव्याच्या ट्रॉलरवर कारवाई केल्याने दोन्ही राज्यांतील व्यावसायिकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातमी अपडेट होत आहे.