पडोसे-सत्तरी येथे पुन्हा गोळीबार

एक जण चौकशीसाठी ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th November, 11:58 pm
पडोसे-सत्तरी येथे पुन्हा गोळीबार

प्रतिनिधी । गोवन वार्ता
वाळपई : पडोसे-सत्तरी येथे गेल्या महिन्यात घडलेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गुरुवारी रात्री त्याच ठिकाणी गोळीबार झाला आहे. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी एअरगन, कारतूस जप्त केले असून एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मागील महिन्यातील पहिली घटना

गेल्या महिन्यात पडोसे-सत्तरी येथे बिगर गोमंतकीय कामगार मोहम्मद अख्तर आलम (३५) आपल्या काही मित्रांसोबत उभा असताना पाठीमागून झालेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता. गोळी त्याच्या मानेला लागली होती. गोमेकॉ येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी गोळी काढल्यास रक्तस्त्रावामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट केले होते. त्या वेळी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अनेकांची जबानी घेतली; मात्र ठोस पुरावा मिळाल्याने तपास पुढे सरकला नाही.

पुन्हा गोळीबार, परिसरात खळबळ

गुरुवारी रात्री सुमारे ११ वाजता एका स्थानिक व्यक्तीच्या बाजूने गोळीबाराचा आवाज ऐकू आला. संबंधित व्यक्ती थोडक्यात बचावला. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. डिचोली पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. यावेळी घटनास्थळी एअरगन कारतूस आढळले.

फॉरेन्सिक पथकाचा तपास आणि ताब्यात घेतलेला संशयित

शुक्रवारी सकाळी वाळपई पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या पथकासह पुन्हा घटनास्थळी जाऊन तपास केला आणि एअरगन कारतूस जप्त केले. सकाळपासून त्या भागात पोलिसांची चौकशी सुरू होती. अनेकांनी दिलेल्या जबानीच्या आधारे पोलिसांनी एका व्यक्तीला एअरगनसह चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा