पुराव्याअभावी डिचोली न्यायालयाचा निवाडा

म्हापसा : बार्देश तालुक्यातील रेवोडा येथील श्री वेताळ माऊली मंदिरात चोरीचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून आरोपी बिष्णू संतोष रॉय यांची डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायाधीश अनुराधा आंद्रादे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, तक्रार, साक्षीदारांचे जबाब आणि रेकॉर्डवरील नोंदीनुसार आरोपीला सध्याच्या गुन्ह्याशी जोडण्यासाठी कोणतेही साहित्य नाही. म्हणून आरोपीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५(अ) आणि ६२ अंतर्गत शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यातून निर्दोष सोडले जात आहे.
मंदिरात कथित घटना ही १२ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे १.५५ वा. घडली होती. तर दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अज्ञाताने मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हेल्मेट, लांब पँट व टी शर्ट घातलेला एक व्यक्ती मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करताना दिसत असला तरी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. साक्षिदारांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिलेली नाही. या प्रकरणात आरोपीचा सहभाग सिद्ध करण्यासाठी कोणतीही ओळख परेड घेण्यात आली नव्हती.
दरम्यान, आपल्यावर लावलेले आरोप खोटे असून फिर्यादीने लावलेल्या आरोपानुसार गुन्हा केलेला मी नाही. त्यामुळे आपली दोषमुक्त सुटका करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज आरोपी रॉय याने न्यायालयाकडे केला होता.
न्यायालयाचे निरीक्षण
न्यायालयाने आरोपीचा सहभाग स्पष्ट होत नसल्याचे निरीक्षण नोंदवले. दोन मतांमध्ये संशय निर्माण झाल्यास, गंभीर संशय निर्माण होत नसेल, तर आरोपी निर्दोष सोडण्यास पात्र असतो, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. या निकालापूर्वी, आरोपी बिष्णू रॉय यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे सांगत दोषमुक्त सुटका करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.