जेनिटो कार्दोझचा दावा : सहसंशयितांच्या जबाबानुसार गोवल्याचा आरोप

पणजी : रामा काणकोणकर याच्यावर हल्ला झाला त्यावेळी मी घटनास्थळी नव्हताे. तसेच माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही. सहसंशयितांच्या जबाबावरून मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. त्यांच्या जबाबाला कोणतेही कायदेशीर महत्त्व नसल्याचा दावा करून सराईत गुन्हेगार जेनिटो कार्दोझ यांनी न्यायालयात जामीन अर्जावर आपली बाजू मांडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार, दि. २८ रोजी होणार आहे.
रामा काणकोणकर यांनी जबाबात मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करत होता. मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडा’ आणि ‘राखणदार’ म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला’, असे सांगितले होते. याची दखल घेऊन पोलिसांनी या गुन्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (छळ प्रतिबंध) कायद्यांतर्गत कलम जोडून हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे चौकशीसाठी सोपवले होते. याच दरम्यान सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याच दरम्यान जेनिटो याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
या प्रकरणी बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली असता, जेनिटो यांच्यातर्फे अॅड. मायकल नाझारेथ यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी वरील दावे मांडले. तसेच जेनिटोला या प्रकरणात नाहक गुंतवण्यात आल्याचा दावा केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. २८) होणार आहे.
काणकोणकर हल्ला प्रकरणी ८ जणांना अटक
करंझाळे येथे १८ सप्टेंबर रोजी रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोझ याच्यासह अँथनी नदार, फ्रान्सिस नदार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर, सुरेश नाईक, फ्रांको डिकॉस्टा व साईराज गोवेकर या आठ जणांना अटक केली होती.