गोवा : अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याच्या आरोपाखाली युवकाविरुद्ध गुन्हा नोंद

सर्वण येथील घटना : व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने ओळख उघड

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
just now
गोवा : अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याच्या आरोपाखाली युवकाविरुद्ध गुन्हा नोंद

डिचोली : एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने स्कुटरवरून सर्वण येथे निर्जन स्थळी नेऊन मारहाण केल्याच्या आरोपाखाली डिचोली पोलिसांनी पडोसे-सत्तरी येथील १९ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या मोठ्या भावाने तक्रार दाखल केली आहे.
ही घटना १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ ते १२.३० च्या दरम्यान वाठादेव-सर्वण येथील निर्जन स्थळी असलेल्या एका मंदिरात घडली. त्या युवकाने अल्पवयीन मुलीला आपल्या स्कूटरवरून डिचोलीहून वाठदेव-सर्वण येथील एका मंदिरात जबरदस्तीने नेले. तिची मान दाबून हल्ला केला आणि मंदिराच्या काँक्रिट टाइल्स केलेल्या पायऱ्यांच्या कडेला तिला खाली पाडले. तिच्या दातांवर ठोसा मारून दात तोडून जखमी केले. तसेच ओठांना दुखापत केली. पालकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना हा प्रकार सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. नंतर या घटनेचा व्हिडिओ त्याने व्हाट्सअॅपवर प्रसिद्ध केला. त्यामुळे अल्पवयीन मुलीची ओळख उघड झाली.
संशयिताने यापूर्वीही अनेकदा या मुलीशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले आहेत. तिच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे डिचोली पोलिसांनी संशयित युवकाविरोधात बीएनएस कलम ११७(२), ३५१(३), ३५२, ६४, ७२, गोवा बाल कायदा २००३ च्या कलम ८(२) आणि कलम ४, ६, ८, १०, १२ अंतर्गत गुन्हा केला आहे. पुढील तपास सुरू आहे.            

हेही वाचा