कोलवा पोलिसांची कारवाई : संशयिताला यापूर्वी चार प्रकरणात झालेली अटक

मडगाव : बाणावली येथील किनारी भागातील एका हॉटेलच्या खोलीत प्रवेश करत १.२० लाखांची रोकड व दोन लाखांची रुद्राक्षाची सोन्याची माळ चोरी झाली होती. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी संशयित कासीम फयाज (३६, मूळ उडुपी कर्नाटक) याला कर्नाटकातून अटक केली. याआधी चोरीच्या चार प्रकरणात त्याच्यावर गुन्हा नोंद आहे.
बाणावली येथील किनारी भागातील एका पंचतारांकित हॉटेलच्या परिसरात संशयित कासिम फयाज याने २१ ऑक्टोबर रोजी बेकायदेशीररित्या प्रवेश केला. त्यानंतर हॉटेलच्या बाल्कनीतून मनीषा विसाना यांच्या खोलीत प्रवेश करत दोन लाख रुपये किमतीची सोन्याच्या रुद्राक्षाची माळ व ४० हजारांची रोख रक्कम चोरी केली. तर शान पटेल यांच्या खोलीतून ८० हजारांची रोख रक्कम चोरी केली होती. हॉटेल व्यवस्थापक शितल सिंग यांनी कोलवा पोलिसात या चोरी प्रकरणी तक्रार नोंद केल्यानंतर कोलवा पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर संशयित फयाज याच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला होता. कोलवा पोलिसांनी संशयित फयाज याला मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून उडपी येथून ताब्यात घेत अटक केली. चौकशीदरम्यान फयाज याने चोरी केलेले सोन्याचे दागिने दक्षिण कन्नड येथील श्री वासुकी ज्वेलर्सचे सुवर्णकार सुदर्शन आचार्य यांना विक्री केल्याचे स्पष्ट केले. मात्र, संशयिताच्या घरात पडताळणी केली असता कोणतीही मौल्यवान वस्तू आढळून आली नाही.
फयाज हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी कोलवा पोलिसांनी किनारी भागातील हॉटेल्सच्या खोलीतून चोरीप्रकरणी त्याला अटक केली होती.
ऑक्टोबर २०२५ मधील प्रकरणात कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नायक यांच्यासह सहकार्यांनी पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा व उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे.
फयाजचा अनेक चोऱ्यांत सहभाग
फयाज याने ऑक्टोबर २०२१ मध्ये वार्कातील रिसोर्टमधून २५ हजारांची रोकड चोरी केली होती.
ऑक्टोबर २०२४ मध्ये वार्कातील क्लबमधून दहा लाखांचे सोन्याचे दागिने चोरले होते. डिसेंबर २०२४ मध्ये वार्कातील क्लबमधून ५ लाखांचे मंगळसूत्र व ११ हजार रोख चोरी केले होते.
फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याच क्लबमधून ३.५० लाखांचे सोन्याचे दागिने व २,७०० रुपये चोरी केले होते. या सर्व प्रकरणात संशयिताला कोलवा पोलिसांनी अटकही केलेली होती.