२०२१ मधील वेळसाव येथील लालू सिंग खून प्रकरण

पणजी : वेळसाव येथील २०२१ मधील लालू सिंग खून प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपी दिनेश कुमार आणि शिवनाथ माजी यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. यानंतर सबळ पुराव्यांअभावी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा रद्द करून दोघांची निर्दोष सुटका केली आहे. याबाबतचा आदेश न्या. सारंग कोतवाल आणि न्या. आशिष चव्हाण यांच्या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला.
वेर्णा पोलिसांनी ३ एप्रिल २०२१ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, मच्छीमार बोटीवर मजुरी करणाऱ्या लालू उर्फ सनी सिंग (२८, कर्नाटक) याचा मृतदेह २ एप्रिल २०२१ रोजी वेळसाव समुद्र किनाऱ्याजवळील एका झोपडीत आढळून आला होता. मृतदेहावरील जखमेच्या खुणा पाहून वेर्णा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश कुमार आणि शिवनाथ माजी या दोघांना अटक केली होती. या दोन्ही संशयितांचा लालू सिंगशी दारू पिण्यावरून वाद झाला होता. हा वाद हाणामारीवर पोहोचला. यातच दिनेश आणि शिवनाथ यांनी लालू सिंगच्या डोक्यात दंडुक्याने प्रहार केला. यातच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याची दखल घेऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे व युक्तिवादानंतर दोन्ही आरोपींना दोषी ठरवून जन्मठेप व १० हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता, या प्रकरणात मारहाणी संदर्भात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. तसेच बोट मालकाच्या सूचनेवरून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बनल्याचा जबाब एका मजुराने दिला आहे. तसेच त्याने दोघा संशयितांना आणि लालू याला झोपडीत एकत्र पाहिल्याचा दावा केला होता. या संदर्भात पुरावे नसल्याचे तसेच त्याच्या आणि इतर साक्षीदारांच्या उलटतपासणीत विसंगती सापडल्यामुळे संशयितांची निर्दोष सुटका करण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी दोघांची निर्दोष सुटका केली.
शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान
सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला दिनेश कुमार आणि शिवनाथ माजी यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. दिनेश कुमार यांच्यातर्फे अॅड. साहील सरदेसाई यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. भाग्यवती गुड्डामावर यांनी साथ दिली. तर शिवनाथ माजी यांच्यातर्फे अॅड. सागर धारगळकर यांनी बाजू मांडली.