गणेशपुरीतील दरोडा प्रकरणातील दरोडेखोर मोकाटच

दरोडेखोर मेघालयमार्गे बांगलादेशात पसार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 mins ago
गणेशपुरीतील दरोडा प्रकरणातील दरोडेखोर मोकाटच

म्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथील डॉ. महेंद्र कामत घाणेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणी दीड महिन्यानंतरही बांगलादेशी दरोडेखोरांची मुख्य टोळी अद्याप म्हापसा पोलिसांच्या हाती लागलेली नाही. दोनापावला येथील धेम्पो यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यामध्ये याच टोळीचा हात आहे.

या टोळीतील सहाही दरोडेखोर हे मेघालयमार्गे बांगलादेशात पसार झाले असून ते भारतात पुन्हा परतण्याच्या प्रतीक्षेत पोलीस आहेत. या टोळीला पलायनास मदत केल्याच्या आरोपाखाली अटक केलेले दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. महेंद्र कामत घाणेकर यांच्या बंगल्यावर हा सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी पीडित चार सदस्यीय घाणेकर कुटुंबियांना धमकावून व बंधक बनवून घरातील ३५ लाखांचा ऐवज लुटला होता. त्यानंतर ही टोळी बेळगावमार्गे बिजापूर कर्नाटकहून बांगलादेशात पसार होण्यास यशस्वी ठरली होती. गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल व मेघालय अशा सहा राज्यांच्या सीमा ओलांडत ही बांगलादेशी टोळी आपल्या मायदेशी पोहोचली होती. वरील सहा राज्यांचे पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या हातावर तुरी देत हे दरोडेखोर बांगलादेशात दाखल झाले होते.

संशयित दरोडेखोर हे बांगलादेशात पलायन करण्यास यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाल्यावर गोवा पोलिसांच्या विविध राज्यांमध्ये पाठवलेल्या पोलीस पथकांना माघारी परतावे लागले होते.

मात्र, या दरोडेखोरांना पलायनास सहकार्य केलेल्या संतोष बाबू बी. (२७, रा. इब्बलुरू, बंगळुरू) व सफिकुल रोहुल अमीर (३७, रा. इब्बलुरू, बंगळुरू) या दोघाही मूळ बांगलादेशी नागरिकांना म्हापसा पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. बांगलादेशात सुखरूप पोहोचेपर्यंत दरोडेखोर टोळी ही वरील दोघाही संशयितांच्या संपर्कात होती.

याप्रकरणी पोलिसांनी भा.न्या.सं.च्या ३३१(३), ११५(२), ३५१(३), १२६(२), ३१०(२), ६१(२), १११ व ३(५) कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

दरोडेखोरांच्या प्रतीक्षेत गोवा पोलीस

दरोडेखोर बांगलादेशात पलायन करण्यास यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाल्यावर गोवा पोलिसांच्या विविध राज्यांमध्ये पाठवलेल्या पोलीस पथकांना माघारी परतावे लागले होते. दरोडेखोर टोळीच्या मागावर गोवा पोलीस असून ही टोळी भारतात परतण्याच्या प्रतीक्षेत ते आहेत.