कासावली येथील अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश

वेर्णा पोलिसांकडून दोघांना अटक : तीन गुरांची सुटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th November, 11:16 pm
कासावली येथील अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश

वास्को : प्राणी क्रूरता प्रतिबंधक जिल्हा संस्थेकडून मिळालेल्या तक्रारीची दखल घेताना वेर्णा पोलिसांनी कासावली येथील अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश केला. अब्दुल बेपारी व शब्बीर बैफारी (रा. कासावली) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तेथे कत्तलीसाठी आणलेल्या तीन गुरांची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणी क्रूरता प्रतिबंधक जिल्हा संस्थेचे अधिकारी राज प्रतिक यांनी याप्रकरणी शनिवार, १५ रोजी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेताना वेर्णा पोलिसांनी रात्री मोरोड- कासावली येथे एका घरावर छापा मारला. घरात अवैध कत्तलखाना असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे तेथील एका शेडमध्ये तीन गुरांना बांधण्यात आले होते. कत्तलीसाठी बांधण्यात आलेल्या या गुरांसमोर चारा पाण्याची कोणतेही व्यवस्था न करता त्यांच्यावर क्रूरता करण्यात आली असल्याचे दिसून आले. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६०च्या कलम ११(१)(१) नुसार, गोवा दमण दिव गोहत्या प्रतिबंधक कायदा १९७८च्या कलम ३,५, ८ नुसार, गोवा प्राणी संरक्षण कायदा १९९५ च्या कलम ४, ५, ८ नुसार तसेच कत्तलखाना नियम २००१ च्या नियम ३ नुसार गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश भोमकर पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, अवैध कत्तलखाना चालविताना तेथे कत्तल केलेल्या गुरांच्या चरबीपासून तूप काढण्यात येत असे. तेथे तुपाने भरलेले काही डबे सापडले.

गुरांची गोशाळेत रवानगी

कत्तल करण्यात आलेल्या गुरांचे अवशेष काही ठिकाणी पुरण्यात आले होते. या गुरांना आणण्यासाठी तसेच त्यांचे मांस विकण्यासाठी एका रिक्षाचा वापर करण्यात येत होता. तेथील तीन गुरांची सुटका करण्यात आल्यावर एका संस्थेच्या गोशाळेत नेण्यात आले. यापूर्वीही अशाप्रकारची घटना तेथे घडली होती. 

हेही वाचा