
फोंडा : पणजी- फोंडा राष्ट्रीय महामार्गावर मंगेशी येथील धोकादायक क्रॉसवर संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या ड्रायव्हरसह बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. जखमींना मडकई आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत.
कामाक्षी ट्रॅव्हल्स (क्र. जीए- ०२-टी-४९३३) ही मंगेशीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी दूध वाहतूक करणारा टेम्पो (क्र. जीए -०२-टी-७२३५) हा पणजीच्या दिशेने जात होता. कुंडई येथील धोकादायक जंक्शनवर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातात बसमधील ड्रायव्हर प्रकाश नाईक (वय ६०, रा. तळावली) हा बसमध्येच अडकून पडला होता. टेम्पोचा ड्रायव्हर अस्लम (वय ३०, रा. हाऊसिंग बोर्ड मडगाव) हा देखील अपघातात गंभीर जखमी झाला आहे. बसमधील आठ प्रवासीसुद्धा जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मडकई आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. काही गंभीर जखमींना फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.