चौघेजण एकाच दुचाकीवर; जाब विचारल्याने काणकोणात झाली हमरीतुमरी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
चौघेजण एकाच दुचाकीवर; जाब विचारल्याने काणकोणात झाली हमरीतुमरी

काणकोण : बुधवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास पणसुलेमार्गे चावडी येथे चौबल सिट आलेल्या मोटारसायकलचा दुसऱ्या दुचाकीला धक्का बसला. यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पणसुलेहून एका मोटारसायकलवरून तीन पुरुष व एक महिला चावडीकडे येत असताना त्यांनी दुसऱ्या मोटारसायकलस्वाराला धक्का दिला. मात्र, थांबण्याऐवजी हे चौघे थेट चावडी येथे पोहोचले. त्यानंतर धक्का बसलेल्या मोटारसायकलस्वाराने चौबल सीट घेऊन आलेल्या त्या व्यक्तींना जाब विचारला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत मडगावहून माणसे आणून ‘काय ते दाखवू’ अशी धमकी दिली. यामुळे स्थानिक नागरिक व हे चार बिगर गोमंतकीय यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, त्यावेळी ड्युटीवरील पोलीस घटनास्थळी नसल्याने जवळपास ४० मिनिटे हे नाट्य सुरूच राहिले.

शेवटी नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व संबंधित चौबल सीट मोटारसायकलस्वारांसह इतरांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात नेले. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक करीत आहेत.

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना नगरसेवक धीरज नाईक गावकर म्हणाले की, स्थानिक नागरिकांवर बाहेरील लोकांनी धावून येऊन धमक्या देणे योग्य नाही. अशा घटना थांबवण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.

आर.एस.एस. स्वयंसेवक जितेंद्र आमशेकर यांनी इशारा देताना म्हटले की, अशा प्रकारच्या घटना आम्ही सहन करणार नाही. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन योग्य तपास करून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करावा.

पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

हेही वाचा