क्रीडापर्यटनाला मिळणार चालना : ‘गोवा सेव्हन्स’ आंतरराष्ट्रीय ओळख वाढवणार
पणजी : गोव्यात रग्बी हा खेळ सर्वात वेगाने वाढत असून, राज्य आता क्रीडापर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित होण्यास सज्ज झाले आहे. गोवा पर्यटन खात्याने रग्बी खेळाला भक्कम पाठबळ दिल्यामुळे, गोव्याची आंतरराष्ट्रीय ओळख उंचावण्याच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळाली आहे.
गोवा सेव्हन्सचे संस्थापक आणि क्रोकोट्रायल्स रग्बी फाऊंडेशनचे अध्यक्ष ब्रँडन क्रॅस्टो यांनी सांगितले की, रग्बीमध्ये स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करण्याची मोठी क्षमता आहे. गोवा सेव्हन्स रग्बी स्पर्धा आणि गोव्यातील हा खेळ पर्यटनाद्वारे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावू शकतो. म्हणूनच गोवा पर्यटन गेल्या हंगामापासून आमचे अधिकृत आणि दीर्घकालीन भागीदार आहे. आम्हाला विश्वास आहे की हे शक्य आहे.
क्रॅस्टो यांनी माहिती दिली की, या स्पर्धेत नेपाळ आणि दक्षिण आफ्रिका येथील संघ सहभागी होत आहेत. याशिवाय केनिया, यूके आणि यूएसए अशा विविध देशांतूनही सहभागासाठी विचारणा होत आहे, परंतु आर्थिक संसाधनांची कमतरता आहे.
रग्बी हा पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्याचा एक उत्तम मार्ग ठरू शकतो. मी विविध विभाग आणि प्रायोजकांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेला पाठबळ द्यावे. पुरेसा निधी उपलब्ध झाल्यास गोव्यातून आपण सहजपणे भारताचे क्रीडापर्यटन केंद्र उभे करू शकतो आणि देशाला जागतिक नकाशावर लोकप्रिय गंतव्यस्थान बनवू शकतो, असे क्रॅस्टो यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मत
१. समाका आइझॅक्स (ऑस्ट्रेलिया, सेमी-प्रो रग्बी खेळाडू) : समाका यांनी गोव्याच्या पाहुणचाराचे कौतुक केले. ते म्हणाले, मी गोव्याच्या नैसर्गिक सुंदरतेने, येथील लोक आणि त्यांच्या आदरातिथ्याने प्रभावित झालो आहे. रग्बी हा फक्त खेळ नसून, तो शिस्त, सामुदायिक भावना आणि एकत्रितपणाची जाणीव देतो. ही तीन तत्त्वे पर्यटनासाठी एक वेगळे आकर्षण निर्माण करतात.
२. गणेश बनिया (नेपाळ रग्बी सेव्हन्स, आंतरराष्ट्रीय खेळाडू) : बनिया याने गोव्यात रग्बीमुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, अशी आशा व्यक्त केली. गोवा पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. एसएजी मैदानावर अनेक तरुण खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. भविष्यात गोवा निश्चितच भारतातील प्रमुख रग्बी राज्यांपैकी एक बनेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.