भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका २-१ ने जिंकली : अभिषेक शर्मा ठरला मालिकावीर

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम सामना गाबा मैदानावर पावसामुळे रद्द करण्यात आला. या निकालामुळे भारताने मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. पहिल्याच सामन्याप्रमाणेच अखेरचा सामना देखील पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही.
ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर भारताने ४.५ षटकांत ५२ धावा केल्या होत्या आणि एकही गडी बाद झाला नव्हता, तेव्हा पंचांनी सामना थांबवला. विशेष म्हणजे, त्यावेळी पाऊस नव्हता, मात्र वीज चमकण्याचा इशारा हवामान विभागाकडून मिळाल्याने सुरक्षा कारणास्तव पंच शॉन क्रेग यांनी खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये परतण्याचे आदेश दिले.
यानंतर मैदानावर लगेच कव्हर आणण्यात आले. काही मिनिटांतच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. खेळाडू व प्रेक्षकांची सुरक्षा लक्षात घेऊन स्टेडियम रिकामी करण्यात आले.
वीज चमकण्याच्या प्रसंगी आयसीसीचा ३०:३० नियम लागू होतो. जर विजेचा प्रकाश आणि गडगडाट यांच्यातील वेळ ३० सेकंदांपेक्षा कमी असेल, तर खेळ तत्काळ थांबवला जातो.
हा नियम खेळाडू, प्रेक्षक आणि मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारतीय सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. गिलने १६ चेंडूत २९ धावा (५ चौकार)
अभिषेक शर्माने १३ चेंडूत नाबाद २३ धावा (२ चौकार, १ षटकार) केल्या. यावेळी भारताचा स्कोअर होता ४.५ षटकांत बिनबाद ५२ होता. त्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि नंतर सामना रद्द घोषित करण्यात आला. या निकालामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातच २-१ ने मालिका जिंकली.
या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. तिसरा व चौथा सामना भारताने जिंकला. पाचवा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे भारताने मालिका २-१ ने जिंकली. भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन करत दुसऱ्या पराभवानंतर सलग दोन विजय मिळवले आणि मालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याला मालिकावीर घोषित करण्यात आले.
त्याने मालिकेत १६१.३८ च्या स्ट्राईक रेटने १६३ धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या ६८ धावा होती.
या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, कॅनबेरामधील सामना पूर्ण व्हावा अशी आमची इच्छा होती, पण हवामान आपल्याला थांबवू शकते. तरीदेखील ०-१ पिछाडीवरून संघाने ज्या पद्धतीने पुनरागमन केले, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही विभागात संघाने उत्कृष्ट कामगिरी केली, असे सूर्या म्हणाला.
टी-२० विश्वचषकासाठी संघ निवड ही नक्कीच चांगली ‘डोकेदुखी’ असेल, कारण अनेक खेळाडू सातत्याने उत्तम कामगिरी करत आहेत.
ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका वर्ल्डकपपूर्वीचा उत्तम सराव ठरतील. घरच्या मैदानावर खेळताना जबाबदारी आणि अपेक्षा दोन्ही वाढतात. पण भारतीय चाहत्यांचा उत्साह आणि पाठिंबा बघता पुढील वर्ल्डकप रोमांचक ठरणार आहे.
सूर्यकुमार यादव, भारतीय कर्णधार
अभिषेक शर्माचा विश्वविक्रम
ब्रिस्बेनमधील सामन्यात अभिषेक शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत १,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. त्याने फक्त ५२८ चेंडूत हा टप्पा गाठला. पूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या टिम डेव्हिड (५६९ चेंडू) याच्या नावावर होता. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव (५७३ चेंडू) आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद १,००० धावा पूर्ण करणारे फलंदाज
अभिषेक शर्मा (भारत) : ५२८ चेंडू
टिम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया) : ५६९ चेंडू
सूर्यकुमार यादव (भारत) : ५७३ चेंडू
फिल सॉल्ट (इंग्लंड) : ५९९ चेंडू