पणजी: ‘आयर्नमॅन ७०.३’ गोवा स्पर्धेची पाचवी आवृत्ती रविवारी शानदार वातावरणात पार पडली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मिरामार समुद्रकिनाऱ्यावरून या शर्यतीला झेंडा दाखवला. या स्पर्धेत पुरुष गटात उझबेकिस्तानच्या कॉन्स्टंटिन बेलोसोव्हने तर महिला गटात यूकेच्या एली गॅरेट हिने विजेतेपद पटकावले.
यावेळी पर्यटन संचालक केदार नाईक, रेस डायरेक्टर दीपक राज, अभिनेत्री आणि रेस वीकेंड अॅम्बेसेडर सैयामी खेर, इव्हेंट डायरेक्टर नील डी'सिल्वा आणि सुनील मोरजकर हेही उपस्थित होते. या स्पर्धेत ३१ देशांतील १,३०० हून अधिक ट्रायथलीट्सनी अरबी समुद्रात उडी घेतली. या स्पर्धेच्या पाच आवृत्त्यांमध्ये आतापर्यंत ६२ देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
हवाई दलाचे रिलेमध्ये वर्चस्व
या आव्हानात्मक शर्यतीत स्पर्धकांना १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे हे अंतर पूर्ण करायचे होते. भारतीय हवाई दलाच्या संघाने रिले स्पर्धेत वर्चस्व गाजवत तिन्ही पोडियम स्थाने (पहिले, दुसरे, तिसरे) सहज पटकावली. मार्गावर जमलेल्या शेकडो समर्थकांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
'सर्वात कठीण पण सुंदर शर्यत'
महिला गटातील विजेती एली गॅरेट हिने तिचा पती टॉम गॅरेट याच्यासोबत या स्पर्धेत भाग घेतला. टॉमने पुरुष गटात ४:५१:३७ वेळेसह आठवे स्थान मिळवले. मी आजपर्यंत केलेल्या सर्वात कठीण ७०.३ स्पर्धांपैकी ही एक होती, पण ती तितकीच सुंदरही होती. समुद्राच्या बाजूने धावताना वेदनांचा विसर पडला, अशी प्रतिक्रिया एलीने दिली. टॉमनेही गोव्यातील आयोजनाचे आणि स्थानिक समर्थनाचे कौतुक केले.
तेजस्वी, अन्नामलाई यांनीही स्पर्धा केली पूर्ण
लोकसभा खासदार तेजस्वी सूर्या यांनी सलग दुसऱ्या वर्षी ‘आयर्नमॅन ७०.३ गोवा’ स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्यासोबत के. अन्नामलाई हेदेखील सहभागी झाले होते; ‘आयर्नमॅन’चा किताब मिळवणारे ते दुसरे भारतीय राजकारणी ठरले आहेत. दरम्यान, शनिवारी झालेल्या ‘आयर्नकिड्स’ शर्यतीत ९०० हून अधिक मुलांनी उत्साहात भाग घेतला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
- पुरुष गट (एकूण)
- प्रथम : कॉन्स्टंटिन बेलोसोव्ह (उझबेकिस्तान) - ४:२५.४७
- द्वितीय : मायकल लेहनिग (जर्मनी) - ४:३६.४२
- तृतीय : मायकल झोल्सर (झेक रिपब्लिक) - ४:४२.१९
- महिला गट (एकूण)
- प्रथम : एली गॅरेट (युनायटेड किंगडम) - ५:१८.४३
- द्वितीय : टिमटिम शर्मा (भारत) - ५:२३.२७
- तृतीय : लुसी ब्लँचार्ड (युनायटेड किंगडम) - ५:३२.०४
- रिले गट (एकूण)
- प्रथम : एअर फोर्स टीम ३ (४:१७.२०)
- द्वितीय : एअर फोर्स टीम ०१ (४:१७.२६)
- तृतीय : एअरफोर्स टीम ३ (४:१८.१२)
महिला गटात भारताला उपविजेतेपद
महिला गटामध्ये ब्रिटनच्या एली गॅरेट हिने ५ तास, १८ मिनिटे आणि ४३ सेकंद अशी वेळ नोंदवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या गटात भारतासाठी अभिमानास्पद कामगिरीची नोंद झाली. भारताच्या टिमटिम शर्मा हिने उत्कृष्ट प्रदर्शन करत ५ तास, २३ मिनिटे आणि २७ सेकंद वेळेसह द्वितीय क्रमांक (उपविजेतेपद) पटकावला. प्रथम : एली गॅरेट (युनायटेड किंगडम), द्वितीय : टिमटिम शर्मा (भारत), तृतीय क्रमांक : लुसी ब्लँचार्ड (युनायटेड किंगडम).


