पहिल्या दिवसअखेर ८ बाद २५६ धावा

पणजी :रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गटातील पहिल्या सामन्यात गोव्याने मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ८४.५ षटकांत ८ बाद २५६ धावा करत चांगली सुरुवात केली आहे. हा सामना गोवा क्रिकेट असोसिएशनच्या पर्वरी येथील अकादमी मैदानावर खेळला जात आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या सलामीवीर मंथन खुटकर (१२) आणि तिसऱ्या क्रमांकावरील अभिनव तेजराणा (१२) यांना अपेक्षित कामगिरी करण्यात यश आले नाही. मात्र, दुसरा सलामीवीर सुयश प्रभुदेसाई (६५) आणि कर्णधार स्नेहल कवठणकर (४१) यांनी तिसऱ्या गडीसाठी ८७ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही भागीदारी गोव्याच्या डावातील सर्वात मोठी ठरली.
यानंतर ललित यादव (४१) आणि दर्शन मिसाळ (४४) यांनी संयमी खेळी करत डावाला गती दिली, परंतु दोघेही अर्धशतकापासून थोडक्यात वंचित राहिले. दोघांचेही मोलाचे विकेट गमावल्याने गोवा थोडासा अडचणीत आला. दिवसखेरीस दीपराज गावकर ३० धावांवर नाबाद असून, यष्टीरक्षक समर दुभाषी आणि व्ही. कौशिक खेळायला बाकी आहेत. गोव्याचा संघ दुसऱ्या दिवशी किमान ३०० धावांचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करेल.
मध्य प्रदेशकडून प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघात फिरकी गोलंदाज सारांश जैनने ७२ धावांत ४ बळी घेत प्रभावी कामगिरी केली. तर आर्यन पांडे, कुमार कार्तिकेय, कुलदीप सेन आणि शुभम शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.