पणजी: तिसऱ्या सॉनिक्स अखिल गोवा १७ वर्षांखालील बास्केटबॉल लीगमध्ये मुलांच्या गटात डॉन बॉस्को ऑरेटरी पणजी आणि मुलींच्या गटात सॉनिक्स संघाने विजेतेपद पटकावले. मिरामार येथील यूथ हॉस्टेलवर हे थरारक अंतिम सामने खेळवण्यात आले.
मुलांच्या अंतिम फेरीत डॉन बॉस्को ऑरेटरीने डॉन बॉस्को फातोर्डाचा ५०-४२ असा पराभव केला, तर मुलींच्या अंतिम फेरीत सॉनिक्सने डॉन बॉस्को फातोर्डावर २८-१८ ने मात करत विजेतेपदावर नाव कोरले.
मुलांच्या अंतिम सामन्यात ऑरेटरीची सरशी
मुलांचा अंतिम सामना वेग, कौशल्य आणि सांघिक खेळाचे उत्तम प्रदर्शन ठरला. यामध्ये डॉन बॉस्को ऑरेटरीने दबावाखाली उत्तम खेळ दाखवला. अॅव्हनर मेंडोन्साने तब्बल २५ गुणांची कमाई करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला नंतर ‘फायनल्स एमव्हीपी’ म्हणून गौरविण्यात आले. डॉन बॉस्को फातोर्डाच्या डेव्हिड झेवियरने १३ गुणांसह शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिली. मुलांच्या विभागात लॉयोला संघाने सॉनिक्सवर २७-२२ असा निसटता विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले.
मुलींमध्ये सॉनिक्स संघ चॅम्पियन
मुलींच्या अंतिम सामन्यात, सॉनिक्स संघाने उत्कृष्ट समन्वय आणि शिस्तबद्ध बचावाचे प्रदर्शन केले. किम डिसोझाच्या १२ गुणांच्या कामगिरीने संघाच्या विजयाचा पाया रचला, ज्यामुळे तिला ‘मुलींच्या विभागातील एमव्हीपी’ किताबाची मानकरी ठरवण्यात आले.
गोवा बास्केटबॉलचे भविष्य उज्ज्वल!
मिरामार येथील यूथ हॉस्टेलवर या लीगमध्ये ३५ हून अधिक सामने खेळवण्यात आले, ज्यात गोव्याभरातील सर्वोत्तम युवा बास्केटबॉल प्रतिभा एकत्र आली. लॉयोलाचा रिची हा एक सातत्यपूर्ण खेळाडू म्हणून चमकला, तर शॉन फर्नांडिस (डॉन बॉस्को फातोर्डा) आणि डॅनियल रॉड्रिग्ज (सॉनिक्स) हे त्यांच्या अष्टपैलू खेळामुळे प्रेक्षकांचे आवडते ठरले.


