चौथ्या टी-२० सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी मात

अष्टपैलूंची निर्णायक कामगिरी : मालिकेत २-१ ने आघाडी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
54 mins ago
चौथ्या टी-२० सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी मात

गोल्ड कोस्ट : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची अष्टपैलूंना प्राधान्य देण्याची रणनीती अखेर यशस्वी ठरली. वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांच्या बहुआयामी कामगिरीच्या जोरावर भारताने चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी मात केली आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
गोल्ड कोस्ट येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. भारताने २० षटकांत ८ बाद १६७ धावा केल्या. शुभमन गिलने ३९ चेंडूंत ४६ धावा, अभिषेक शर्माने २१ चेंडूंत २८ धावा, शिवम दुबेने १८ चेंडूंत २२ धावा आ​​णि अक्षर पटेलने ११ चेंडूंत नाबाद २१ धावांचे योगदान दिले.
शुभमन आणि अभिषेकने आक्रमक सुरुवात करून दिली. पण ‘पॉवरप्ले’नंतर भारताची धावगती मंदावली. झाम्पा आणि एलिस यांनी मधल्या षटकात भारतीय फलंदाजांवर नियंत्रण मिळवले. सूर्यकुमार यादवने १० चेंडूंत २० धावा झळकावल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने (१२) आणि अक्षरने (२१ नाबाद) अखेरच्या षटकांत काही दमदार फटके मारत संघाला १६७ पर्यंत नेले. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने ३१ धावांत ३ आणि ॲडम झाम्पाने ४५ धावांत ३ बळी घेतले.
१६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. आठव्या षटकात त्यांचा स्कोअर १ बाद ६२ होता. पण तिथून भारताने जोरदार पुनरागमन केले. अक्षर पटेलने जोश इंग्लिस (१२) ला बाद करत मोर्चा उघडला. लगेचच शिवम दुबेने मिचेल मार्श (३०) ला माघारी पाठवले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोलमडला. एक वेळ ३ बाद ९१ असलेल्या संघाने पुढील ७ गडी फक्त २८ धावांत गमावले.
टीम डेव्हिड (१४), मार्कस स्टोइनिस (१७), मॅथ्यू शॉर्ट (२५) यांनी थोडा प्रतिकार केला, पण सुंदर, दुबे आणि अक्षर यांनी एकामागोमाग एक बळी घेत सामना भारताच्या बाजूने झुकवला.
ऑस्ट्रेलियाचा डाव १८.२ षटकांत ११९ धावांतच गारद झाला. ही आॅस्ट्रेलियाची मायदेशातील टी-२० सामन्यातील त्यांची दुसरी नीचांकी धावसंख्या ठरली.
भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ३ धावांत ३, अक्षर पटेलने २० धावांत २ आणि शिवम दुबेने २० धावांत २ गडी बाद केले. अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. सामनावीर म्हणून अक्षर पटेलची निवड करण्यात आली.
विजयाचे श्रेय फलंदाजांना : सूर्या
विजयाचे श्रेय सर्व फलंदाजांना जाते. आम्हाला ठाऊक होते की या खेळपट्टीवर २००-२२० धावा करणे अवघड आहे. शुभमन आणि अभिषेकने खेळाच्या गतीला योग्य दिशा दिली. गोलंदाजांनी दवाच्या परिस्थितीशी जुळवून घेत उत्कृष्ट कामगिरी केली, त्यामुळेच विजय मिळवता आला.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ८ बाद १६७
(शुभमन गिल ४६, अभिषेक शर्मा २८, शिवम दुबे २२, अक्षर पटेल नाबाद २१; नेथन एलिस ३/२१, झाम्पा ३/४५)
ऑस्ट्रेलिया : १८.२ षटकांत सर्वबाद ११९
(मिचेल मार्श ३०, मॅथ्यू शॉर्ट २५, मार्कस स्टोइनिस १७; वॉशिंग्टन सुंदर ३/३, अक्षर पटेल २/२०, शिवम दुबे २/२०)