अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्णा चौथ्या फेरीतील बरोबरीनंतर टायब्रेकमध्ये

फिडे विश्वचषक २०२५ : भारतीय खेळाडूंचा दबदबा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
12th November, 11:47 pm
अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्णा चौथ्या फेरीतील बरोबरीनंतर टायब्रेकमध्ये

पणजी : फिडे विश्वकप २०२५ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी, आर. प्रज्ञानंद आणि पी. हरिकृष्णा यांनी आपापले सामने बरोबरीत सोडत टायब्रेकमध्ये प्रवेश केला. बुधवारी झालेल्या या सामन्यांत सर्व भारतीय खेळाडूंनी सशक्त बचावात्मक खेळ सादर केला.
अर्जुन एरिगेसीने अनुभवी हंगेरीयन जीएम पीटर लेकोविरुद्ध पांढऱ्या मोहर्‍यांनी खेळताना ३६ चालींनंतर बरोबरी स्वीकारली. प्रज्ञानंदने रशियाच्या जीएम दानियिल दुबोवविरुद्ध ३० चालींनंतर सामना ड्रॉ केला, तर हरिकृष्णाने स्वीडनच्या जीएम निल्स ग्रँडेलियसविरुद्ध ३८ चालींनंतर सामना बरोबरीत संपवला.
दरम्यान, पेरूच्या जीएम जोसे एडुआर्डो मार्टिनेज अल्कांतराने काळ्या मोहर्‍यांनी मंगळवारी विजय मिळवला होता. त्यानंतर बुधवारी त्याने रशियाच्या जीएम अलेक्सी साराना याच्याविरुद्ध २० चालींनंतर तीन वेळा पुनरावृत्तीचा नियम लागू करत बरोबरी स्वीकारली आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आता तो हरिकृष्णा आणि ग्रँडेलियस यांच्यातील विजेत्याशी सामना करणार आहे.
दोनवेळा विश्वकप विजेता जीएम लेव्हॉन आरोनियनने देखील पोलंडच्या जीएम राडोस्लाव वोइटासेकविरुद्ध ३५ चालींनंतर बरोबरी साधत पुढील फेरी गाठली. भारतीय खेळाडूंपैकी अर्जुन आणि प्रज्ञानंद या दोघांच्या सामन्यांवर विशेष लक्ष केंद्रित झाले होते.
अर्जुनने पांढऱ्या मोहर्‍यांनी निम्झो-इंडियन ओपनिंगचा पर्याय स्वीकारला होता आणि पहिल्या १६ चालींनंतर तो आघाडीवर होता. परंतु हंगेरीच्या लेकोने उत्कृष्ट बचाव केला. २०व्या चालीत राणींची अदलाबदल केल्यानंतर अर्जुनने पुढे प्रयत्न केले, मात्र त्याला निर्णायक आघाडी मिळवता आली नाही.
लेकोने सामन्यानंतर सांगितले, अर्जुन खूप वेगाने खेळत होता, त्यामुळे थोडा दबाव जाणवत होता. पण ही ओपनिंग लाईन मला चांगली परिचित होती आणि मी आत्मविश्वासात होतो. एकंदरित सामना समसमान राहिला.
प्रज्ञानंदने देखील ३० चालींनंतर दुबोवविरुद्ध बरोबरी साधली. तो पुढील टायब्रेक सामन्यात पुन्हा काळ्या मोहर्‍यांनीच सुरुवात करणार आहे. हरिकृष्णा आणि ग्रँडेलियस यांच्यातील सामन्यात भारतीय खेळाडू पांढऱ्या मोहर्‍यांनी खेळत असला तरी सुरुवातीला दबावाखाली होता. पण त्याने शांतपणे खेळ करत उंट आणि प्याद्यांच्या एंडगेममध्ये सामना ड्रॉ केला.
दरम्यान, जागतिक कनिष्ठ विजेता प्रणव व्ही. याचा प्रवास चौथ्या फेरीतच संपला. उज्बेकिस्तानच्या जीएम नोदीरबेक याकुब्बोएवने त्याच्यावर ३८ चालींनंतर विजय मिळवला.
भारतीय खेळाडूंचे निकाल (फेरी ४, सामना २)
जीएम अर्जुन एरिगेसी (बरोबरी) वि. जीएम पीटर लेको (हंगेरी) (१:१)
जीएम दानियिल दुबोव (बरोबरी) वि. जीएम आर. प्रज्ञानंद (१:१)
जीएम पी. हरिकृष्णा (बरोबरी) वि. जीएम निल्स ग्रँडेलियस (स्वीडन) (१:१)
जीएम नोदीरबेक याकुब्बोएव (उज्बेकिस्तान) (विजय) वि. जीएम प्रणव व्ही. (१.५:०.५)
जीएम ले क्वांग लियेम (व्हिएतनाम) (विजय) वि. जीएम कार्तिक वेंकटरामन (१.५:०.५)