दिप्तयान घोषचा नेपोमनियाचचीवर सनसनाटी विजय

फिडे विश्वचषक २०२५ : हरिकृष्णा तिसऱ्या फेरीत, विश्वविजेता गुकेश, अर्जुन पुढील फेरीत

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
57 mins ago
दिप्तयान घोषचा नेपोमनियाचचीवर सनसनाटी विजय

पणजी : भारताचा ग्रँडमास्टर दिप्तयान घोष याने बुधवारी मोठा उलटफेर करत, काळ्या मोहरांनी खेळताना दोन वेळा कँडीडेट्स विजेता ठरलेल्या इयान नेपोमनियाचचीला हरवले. त्याचबरोबर, ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णाने जवळपास निर्दोष कामगिरी करत आर्सेनी नेस्टरोवचा पराभव केला आणि बुधवारी पणजी येथे सुरू असलेल्या फिडे विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. विश्वविजेता गुकेश डी आणि सर्वोच्च मानांकन असलेला भारतीय खेळाडू अर्जुन एरिगैसी हेही पुढील फेरीत पोहोचले आहेत.
दिप्तयानची मोठी कामगिरी
नेपोमनियाचची विरुद्धच्या दुसऱ्या फेरीतील पहिला गेम पांढऱ्या मोहरांनी बरोबरीत सुटल्यानंतर, दुसऱ्या गेममध्ये दिप्तयान घोषने सुरुवातीलाच रशियन खेळाडूने केलेल्या एका लहान चुकीचा फायदा घेतला. भारतीय ग्रँडमास्टरने अवघ्या ४७ चालींमध्ये विजय मिळवला. नेपोसारख्या खेळाडूला हरवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आजचा दिवस निश्चितच खूप महत्त्वाचा आहे. हा विजय पचवायला थोडा वेळ लागेल, अशी प्रतिक्रिया दिप्तयानने आपला पहिला विश्वचषक खेळताना दिली.
हरिकृष्णाची आक्रमक चाल
तत्पूर्वी, ३९ वर्षीय हरिकृष्णाने आठव्या चालीतच आपल्या राणीचा त्याग करून नेस्टरोवचा घोडा आणि बिशप पकडून सामन्यात आघाडी घेतली. त्याने अवघ्या २९ चालींमध्ये सामना जिंकत तिसऱ्या फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. हरिकृष्णाने मंगळवारी आपल्या रणनीतीबद्दल बोलताना सांगितले की, मी ही चाल नऊ वर्षांपूर्वी तयार केली होती आणि ती आता वापरायची की नाही, या विचारात होतो. माझ्या प्रतिस्पर्धकाला याबद्दल माहीत नसावे, असे मला वाटले आणि मी ती खेळण्याचा निर्णय घेतला.
गुकेश, अर्जुनचा सहज विजय
पहिला गेम पांढऱ्या मोहरांनी ड्रॉ खेळणाऱ्या गुकेशने कझाकस्तानच्या २०२४ च्या विश्व ज्युनियर चॅम्पियन काझीबेक नोगेरबेकला ५९ चालींमध्ये हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. अर्जुन एरिगैसी दोन्ही सामने जिंकणारा एकमेव भारतीय ठरला. त्याने बल्गेरियाचा ग्रँडमास्टर मार्टिन पेट्रोव्हला पांढऱ्या मोहरांनी ४८ चालींमध्ये हरवून २-० असा विजय मिळवला.
दरम्यान, दुसऱ्या फेरीत एकूण १७ भारतीय खेळाडू रिंगणात होते. त्यापैकी, ग्रँडमास्टर रौनक साधवानी, विदित गुजराती, आर. प्रज्ञानंद आणि नारायणन एसएल यांनी आपले दोन्ही सामने ड्रॉ केल्यानंतर आता ते टायब्रेक राउंडमध्ये प्रवेश करत आहेत. विश्व ज्युनियर चॅम्पियन प्रणव व्ही. देखील नॉर्वेच्या आर्यन तारीकडून दुसरा गेम हरल्यानंतर गुरुवारी टायब्रेक खेळणार आहे.
स्पर्धेतील भारतीयांचे निकाल
* दिप्तयान घोष वि. इयान नेपोमनियाचची (रशिया) विजयी (१.५-०.५)
* पी हरिकृष्णा वि. आर्सेनी नेस्टरोव (एफआईडी) विजयी (१.५-०.५)
* गुकेश डी वि. नोगेरबेक काझीबेक (कझाकस्तान) विजयी (१.५-०.५)
* अर्जुन एरिगैसी वि. मार्टिन पेट्रोव्ह (बल्गेरिया) विजयी (२-०)
* आर प्रज्ञानंद वि. तेमुर कुयबोकारोव (ऑस्ट्रेलिया) बरोबरी (१-१)
* रौनक साधवानी वि. रॉबर्ट होवनहिस्यान (आर्मेनिया) बरोबरी (१-१)
* विदित गुजराती वि. फॉस्टिनो ओरो (अर्जेंटिना) बरोबरी (१-१)
* नारायणन एसएल वि. निकिता विटीगोव (इंग्लंड) बरोबरी (१-१)
* प्रणव व्ही. वि. आर्यन तारी (नॉर्वे) बरोबरी (१-१)
* कार्तिकेयन मुरली वि. पौया इदानी (आयआरए) बरोबरी (१-१)
* सूर्य शेखर गांगुली वि. मॅक्सिम वचियर-लाग्रेव (फ्रान्स) पराभूत (०.५-१.५)
* अरोन्याक घोष वि. लेवोन अरोनियन (अमेरिका) पराभूत (०.५-१.५)
* अभिमन्यु मिश्रा वि. सालेह सलेम (इराक) पराभूत (०.५-१.५)
* इनियान पी वि. थाई दाई वान गुयेन (चेक गणराज्य) पराभूत (०.५-१.५)