चिंचणी देवसू पंचायतीच्या बालग्रामसभेत विद्यार्थ्यांनी मांडल्या ५० सूचना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
चिंचणी देवसू पंचायतीच्या बालग्रामसभेत विद्यार्थ्यांनी मांडल्या ५० सूचना

मडगाव : चिंचणी देवसू पंचायतीने आयोजित केलेल्या बालग्रामसभेत विद्यार्थ्यांनी गावातील विविध समस्यांवर मोकळेपणाने चर्चा केली. या सभेत विद्यार्थ्यांकडून ५० हून अधिक सूचना देण्यात आल्या असून त्यात मुख्यतः स्वच्छता, क्रीडा सुविधा आणि सुरळीत वीजपुरवठ्याच्या मागण्या होत्या.
विद्यार्थ्यांनी विशेषत: एप्रिल महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय चुकीचा असल्याची नाराजी व्यक्त केली. एप्रिलमधील उष्णतेत अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत कठीण होते, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
चिंचणी माऊंट मेरी हायर सेकंडरी स्कूल आणि एंजल्स कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बालग्रामसभेत सहभाग घेतला. त्यांनी गावात स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, क्रीडा सुविधा वाढवून आवश्यक साधनसामग्री पुरवावी, सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करावा, एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय पुनर्विचार करावा आदी मागण्या केल्या. विद्यार्थ्यांनी सांगितले की, उष्णतेच्या तीव्रतेमुळे दुपारच्या सत्रात अभ्यास करणे कठीण होते, ज्याचा थेट त्यांच्या शिकण्यावर परिणाम होतो.
बालग्रामसभेत मुलांना मार्गदर्शन करताना डॉ. गुणाजी देसाई म्हणाले, बालग्रामसभा हा अत्यंत उपयुक्त आणि काळाची गरज असलेला उपक्रम आहे. यामुळे मुलांना पंचायतीचे कामकाज समजते, तसेच त्यांच्या मनातील गावाची कल्पना आणि समस्या मांडण्याचे व्यासपीठ त्यांना मिळते.
पंचायतीकडून सकारात्मक प्रतिसाद
चिंचणीचे सरपंच फ्रँक व्हिएगस म्हणाले, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही बालग्रामसभा आयोजित केली असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद आहे. मुलांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा पंचायत पातळीवर गांभीर्याने विचार केला जाईल. संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली नाराजी संबंधित शैक्षणिक विभागापर्यंत पोहोचवली जाईल.