बिहारमध्ये काँग्रेसला फक्त ६ जागा : एनडीएचा २०२ मतदारसंघांत विजय, तर महागठबंधनला केवळ ३५ जागा

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठे यश मिळाले. एकूण २४३ पैकी २०२ जागांवर एनडीएने विजयी ध्वज फडकवला आहे. काँग्रेस आणि राजदचा दारुण पराभव झाला. एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या आहेत. संयुक्त जनता दलाने ८५ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रीय जनता दलाने २५ जागा जिंकल्या आहेत. लोकजनशक्ती पार्टीने (रामविलास पासवान) १९ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने सहा जागा जिंकल्या आहेत. एआयएमआयएमने ५ जागांवर विजय नोंदवला आहे. हिंदुस्थानी अवाम मोर्चाने (हम) ५, तर सीपीआय एमएलने २ जागांवर विजय नोंदवला आहे. आयआयपी, सीपीआय (एम) आणि बीएसपी यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष आणि ‘आप’ यांची पाटी मात्र कोरीच राहिली.
आक्रमक रणनीतीचा विजय
एनडीएने मिळवलेल्या घवघवीत यशाच्या मागे भाजपची आक्रमक रणनीती आणि मोदी-नितीश जोडीचा प्रभाव दिसून आला. विजयाचे मोठे श्रेय भाजपचे रणनीतीकार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिले जात आहे. संघटन मजबूत करण्यात आणि उमेदवारांची निवड करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत ठरणार
नितीशकुमार यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले असते, तर विरोधकांनी त्यांच्या आजारपणावरून अपप्रचार केला असता, हा डाव उधळून लावण्यासाठी एनडीएच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नाही, असे भाजपचे केंद्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची निवड एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशांत किशोर निष्प्रभ
निवडणुकीत प्रशांत किशोर आणि त्यांच्या नव्या ‘जन सुराज’ पक्षाची सर्वाधिक चर्चा होती. निवडणूकपूर्व काळात प्रशांत किशोर यांनी राज्यभर काढलेल्या पदयात्रा आणि सभांमुळे त्यांच्या पक्षाकडून मोठ्या उलथापालथीची अपेक्षा निर्माण झाली होती; परंतु जन सुराज पक्षाला एकाही मतदारसंघात विजय मिळवता आला नाही.


बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठी आघाडी मिळली आहे. बिहारमधील जंगलराज संपुष्टात आणून दहा वर्षांत डबल इंजिन सरकारने विकास केला आहे. जात, धर्म व इतर मुद्दे बाजूला ठेवून जनतेने विकासाला मतदान केल्याबद्दल बिहारच्या जनतेचे अभिनंदन !
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री