मडगावात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘जनजातीय गौरव दिन’

मडगाव : जल, जमीन व जंगल यावर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे. वन हक्क कायद्यांतर्गत उर्वरित पाच हजार प्रकरणे पुढील वर्षापर्यंत निकाली काढणार. जमिनीचा हक्क आदिवासी बांधवांना देणे हीच खरी भगवान बिरसा यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
याशिवाय मूळ संस्कृती टिकण्यासाठी राज्यात मॉडेल ट्रायबल व्हिलेज तयार करण्याचा विचार आहे. विकसित भारत २०४७ व विकसित गोवा २०३७ करण्यासाठी सर्वांचा पाठिंबा आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून मडगाव येथील एसजीपीडीए मैदानावर आयोजित कार्यक्रमात साजरी करण्यात आली. यावेळी सभापती गणेश गावकर, बांधकाममंत्री दिगंबर कामत, आदिवासीमंत्री रमेश तवडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, माजी मंत्री बाबू कवळेकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार शांताराम सिद्दी, आमदार उल्हास तुयेकर, आमदार दाजी साळकर, खासदार सदानंद शेट तानावडे, वासुदेव मेंग गावकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाआधी गोव्यातील विविध भागातून दुचाकी रॅली काढण्यात आल्या.
बिरसा मुंडांचा विचार पुढे नेणार : तवडकरपंतप्रधान मोदी विकसित भारत संकल्पनेचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भगवान बिरसा मुंडा यांनी आपले आयुष्य समाजासाठी समर्पित केलेले आहे. गोव्यातील समाजाचे दु:ख दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंडा यांनी जो विचार दिलेला आहे, तो पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे, असे मंत्री तवडकर यांनी सांगितले.
आदिवासी समाजाला धर्म नसल्याची टीका काहीजणांकडून होते. मात्र, आदिवासी हे हिंदू होते, हिंदू आहेत व हिंदूच राहतील. जंगलात ऋषीमुनींकडून आचरण व्हायचे त्यावेळी त्यांचे संरक्षणाचे काम आदिवासी समाजाने केले होते. त्यामुळे आदिवासी हे धर्मपालक, धर्मआचरक, धर्मरक्षकही आहेत, असे कर्नाटकातील खासदार शांताराम सिद्दी यांनी सांगितले.