प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयितांना रामा, सोयरूंनी ओळखले

जेनिटो कार्दोझसह आठही जणांची कोठडी वाढवली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th November, 11:11 pm
प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयितांना रामा, सोयरूंनी ओळखले

पणजी : समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी तिसवाडीच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी घेतलेल्या ओळख परेडचा अहवाल सकारात्मक आला आहे. काणकोणकर आणि तक्रारदार सोयरू वेळीप यांनी संशयितांना ओळखले असून, दरम्यान, न्यायालयाने मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोझसह आठही संशयितांची कोठडी १४ दिवसांनी वाढवली आहे.

मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोझ आणि इतर सात जणांची कोठडी १४ दिवसांनी वाढवली आहे. या आठही संशयितांची मागील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना गुरुवार (दि. १३) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना पुन्हा १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

१८ सप्टेंबर रोजीचा हल्ला

करंझाळे येथे १८ सप्टेंबर रोजी रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोझ याच्यासह अँथनी नदार, फ्रान्सिस नदार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर, सुरेश नाईक, फ्रांको डिकॉस्टा व साईराज गोवेकर या आठ जणांना अटक केली होती.

रामा काणकोणकर यांनी जबाबात ‘मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करत होता. मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडा’ आणि ‘राखणदार’ म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला’, असे सांगितले होते. याची दखल घेऊन पोलिसांनी या गुन्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (छळ प्रतिबंध) कायद्याअंतर्गत कलम जोडून हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे चौकशीसाठी सोपवले. याच दरम्यान सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याने न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

ओळख परेड यशस्वी

या प्रकरणाच्या तपासाअंतर्गत तिसवाडीच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी ७ रोजी ओळख परेड घेतली होती. त्यावेळी समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर आणि तक्रारदार सोयरू वेळीप यांनी हल्ला करणारे संशयित अँथनी नदार, फ्रान्सिस नदार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर, सुरेश नाईक, फ्रांको डिकॉस्टा व साईराज गोवेकर यांना ओळखले. या संदर्भात अहवालही कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी ११ रोजी पोलिसांना सादर केला आहे.

तपास अंतिम टप्प्यात

या प्रकरणाच्या तपासाअंतर्गत रामा काणकोणकर यांचा न्यायदंडाधिकाऱ्याकडे जबाब नोंद झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत पोलीस या संदर्भात न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत.

हेही वाचा