झेडपीसाठी भाजप उमेदवारांची नावे चार दिवसांत जाहीर : दामू नाईक

म्हापसा बैठकीत उत्तर गोव्यातील २५ जागांवर उमेदवार निश्चित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
झेडपीसाठी भाजप उमेदवारांची नावे चार दिवसांत जाहीर : दामू नाईक

म्हापसा : जिल्हा पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली. उत्तर गोव्यातील २५ जागांवर भाजप उमेदवार निश्चितीवर सविस्तर चर्चा झाली. येत्या तीन-चार दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री विश्वजित राणे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार प्रेमेंद्र शेट, माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्येकर, तसेच दत्ता खोलकर, प्रेमानंद म्हांबरे, दयानंद कारबोटकर हे उपस्थित होते.
शिवाय पक्षाच्या गाभा समितीचे सदस्य, उत्तर जिल्ह्यातील आमदार, सरपंच, पंच सदस्य, मंडळ अध्यक्ष, जिल्हा पंचायत सदस्य व पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते व मतदारसंघ निहाय इच्छुक उमेदवार उपस्थित होते. प्रत्येक मतदारसंघातील नेते मंडळीची गाभा समितीसोबत बंद दाराआड स्वतंत्र चर्चा झाली. काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या नावांना सर्वानुमते पसंती मिळाली. तर काही ठिकाणी आलेल्या दोन-तीन उमेदवारांची नावे आली असून त्यातील एकाची निवड होणार आहे.
शुक्रवारीदेखील कार्यालयात उमेदवारांची निवड करण्यासाठी बैठक होणार आहे. त्यानंतर दक्षिण गोवा जिल्ह्यातील उमेदवारांच्या निवडीसाठी मडगाव जिल्हा कार्यालयात पक्ष नेत्यांची बैठक होणार आहे, असे दामू नाईक म्हणाले. दरम्यान, पक्षाची निवडणूक समिती ही उमेदवारांची अंतिम नावे ठरवतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
लोकशाही मार्गाने निवड प्रक्रिया
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, भाजपमध्ये लोकशाही मार्गाने उमेदवारांची निवड प्रक्रिया होते. स्थानिक पातळीवरून आलेल्या नावांवर या बैठकीत चर्चा झाली. अधिकतर नावांवर सर्वानुमते एकमत झाल्याने समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा