गोवा : ‘मुझे कलेक्टर बनना है... क्या करना पडेगा?’ चिमुरडीचा ​जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न

मुख्यमंत्र्यांमुळे काणकोणच्या दुर्वाला मिळाला मोलाचा संदेश

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
गोवा : ‘मुझे कलेक्टर बनना है... क्या करना पडेगा?’ चिमुरडीचा ​जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न

पणजी : ‘मै काणकोण (Canacona) से आयी हूं. मेरा नाम दुर्वा दैकर है. मुझे कलेक्टर (Collector) बनना है. उसके लिए मुझे क्या करना पडेगा?’ असा धीट सवाल एका चिमुरडीने उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी​ अंकित यादव (Ankit Yadav) यांना केला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्या प्रश्नाला आपुलकीने उत्तर तर दिलेच, पण त्याबाबत मोलाचे मार्गदर्शनही केले. हा अविस्मरणीय क्षण प्रत्यक्षात आला तो मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa Chief Minister Dr. Pranod Sawant) यांच्या एका आदर्शवत कृतीमुळे.


दै. गोवन वार्ताच्या (Govan Varta) हुप्पा हुय्या (Huppa Huyya) बाल विशेषांकाच्या चित्रकला महास्पर्धेत (drawing competition) काणकोण तालुक्यातून सरकारी प्राथमिक विद्यालय, आमोणे पैंगीणची पहिलीतील विद्यार्थिनी दुर्वा दुर्गेश दैकर विजेती ठरली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर ती आली आणि मुख्यमंत्र्यांच्या आपुलकीच्या एका प्रश्नाने हा सोहळा तिच्या कायम स्मरणात राहील, अशी गोष्ट घडली. दुर्वा हिला मुख्यमंत्र्यांनी ‘मोठी झाल्यावर कोण होणार,’ असे विचारले. यावेळी तिने आपल्याला कलेक्टर (जिल्हाधिकारी) व्हायचे असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिच्या पालकांना आणि आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर लगेच उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले. ‘तिथे जिल्हाधिकाऱ्यांना भेट आणि जिल्हाधिकारी होण्यासाठी काय करावे लागते, याची माहिती घे,’ असे मुख्यमंत्र्यांनी दुर्वाला सांगितले.


कार्यक्रम पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी आणि दुर्वाचे पालक तिला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी तिचे स्वागत करून तिची आपुलकीने विचारपूस केली. दुर्वा हिने आत्मविश्वासाने आपल्याला जिल्हाधिकारी व्हायचे आहे, असे सांगून त्यासाठी काय करायला हवे, अशी विचारणा यादव यांना केली.
जिल्हाधिकारी होण्यासाठी शालेय शिक्षण, पदवी पूर्ण करून आयएएसची स्पर्धा परीक्षा देण्याचा सल्ला जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दुर्वाला दिला. त्याआधी शालेय शिक्षणावर लक्ष केंद्रित करून नंतर पदवी अभ्यासक्रमात विशिष्ट विषयांना महत्त्व देण्याबाबतही मोलाचे मार्गदर्शन केले. इतकेच नव्हे, तर या संवादानंतर त्यांनी दुर्वाला काही वेळ आपल्या खुर्चीत बसण्याची संधीदेखील दिली.