
तिरुपती येथील श्री बालाजी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांना श्री बालाजीचा प्रसाद म्हणून मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी)कडून लाडू दिला जातो. हा प्रसादाचा लाडू गेल्यावर्षीपासून वादात सापडला आहे.
हे लाडू तूप, पीठ, साखर, सुका मेवा अशा शुद्ध शाकाहारी घटकांपासून बनवले जातात. मात्र, काही वर्षांपासून या लाडूमध्ये बनावट तूप वापरल्याचे दिसून आले आहे. सध्या तुपात भेसळ झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तुपाचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने मागील पाच वर्षांत दूध किंवा लोणी खरेदी केलेले नाही. तरीही त्यांनी २५० कोटी रुपयांचे ६८ लाख किलो तूप पुरवले आहे. या प्रकरणी अजय कुमार सुगंध याला अटक झाली आहे. त्याने उत्तराखंडमधील भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीला मोनोडिग्लिसराइड्स आणि अॅसिटिक अॅसिड एस्टरसारखी रसायने पुरवली होती. लाडूसाठी तूप पुरवण्याचे कंत्राट त्याला तिरुमला तिरुपती देवस्थानने दिले होते. २०१९ ते २०२४ या काळात डेअरीचे प्रवर्तक पॉमिल जैन आणि विपिन जैन यांनी बनावट तूप पुरवले. त्यांनी बनावट तूप बनवण्याचा कारखाना उभारला. दूध खरेदी आणि पेमेंट नोंदींमध्ये बनावटगिरी केली. याविषयीचे तपशील नेल्लोर न्यायालयात सादर केलेल्या एसआयटीच्या अहवालात नमूद आहेत. सीबीआयने सांगितले की, भोले बाबा डेअरीला २०२२ मध्ये ‘काळ्या यादी’त टाकले होते, तरीही त्यांनी मंदिराला भेसळयुक्त तूप पुरवणे सुरूच ठेवले. त्यांनी इतर डेअऱ्यांच्या माध्यमातून कंत्राटासाठी बोली लावली, यात तिरुपती येथील वैष्णवी डेअरी, उत्तर प्रदेशातील मल गंगा आणि तामिळनाडूमधील एआर डेअरी फूड्स यांचा समावेश होता.
सीबीआयने उघड केले की, मागील वर्षी एआर डेअरीने पुरवलेले आणि मंदिराने नाकारलेल्या जनावरांच्या चरबीची भेसळ असलेले तुपाचे चार कंटेनर, भोले बाबा डेअरीच्या प्रवर्तकांनी वैष्णवी डेअरीच्या माध्यमातून मंदिराला पुन्हा पुरवले. एका महिन्यानंतर आंध्र प्रदेश सर्कल श्रेणी अंतर्गत वैष्णवी डेअरीने तूप पुरवले होते. या डेअरीने ट्रक्सवरील लेबले बदलली, गुणवत्ता सुधारणा डेटा बनावट केला आणि नाकारलेले तूप मंदिराला पुन्हा पुरवले. अजय कुमारने सात वर्षांपासून भोले बाबा डेअरीचे संचालक जैन यांना जी रसायने पुरवली होती, ती पामतेल बनवण्यासाठी वापरतात. एसआयटीने अजय कुमार आणि भोले बाबा डेअरीच्या संचालकांना जोडणारे रासायनिक पुरवठा आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे गोळा केले आहेत. त्याला दिल्लीतून ताब्यात घेऊन तिरुपतीला आणले. नेल्लोर एसीबी न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली. भाविकांच्या श्रद्धांशी, आरोग्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली तरच अशा प्रकारांची पुनरावृत्ती टळेल.
- प्रदीप जोशी