मुलांमधील कल्पकता जागृत ठेवण्यासाठी ‘हुप्पा हुय्या’सारखे उपक्रम आवश्यक !

मुख्यमंत्र्यांचे मत : ‘हुप्पा हुय्या’ बाल विशेषांकाचे प्रकाशन, चित्रकला महास्पर्धेचे बक्षीस वितरण


2 hours ago
मुलांमधील कल्पकता जागृत ठेवण्यासाठी ‘हुप्पा हुय्या’सारखे उपक्रम आवश्यक !

बाल चित्रकला महास्पर्धेतील विजेत्यांसोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार दाजी साळकर, मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक आनंद डिंगणकर, प्रुडंट मीडियाचे संपादक संचालक प्रमोद आचार्य, गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर आणि ‘द गोवन एव्हरिडे’चे संपादक ज्योएल आफान्सो.    (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : लहान मुलांमधील कल्पकता, जागरूकता, नाविन्य कायम ठेवण्यासाठी ‘गोवन वार्ता’चा ‘हुप्पा हुय्या’ बाल विशेषांक आणि बाल चित्रकला महास्पर्धा यासारखे उपक्रम आवश्यक आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. बुधवारी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, प्रुडंट मीडियाचे संपादक संचालक प्रमोद आचार्य, ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर, ‘द गोवन’चे संपादक जोएल अफान्सो, बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यापस्थापक आनंद डिंगणकर उपस्थित होते.


मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लहान मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘गोवन वार्ता’तर्फे ‘हुप्पा हुय्या’ बाल विशेषांकाचे प्रकाशन केले जाते. चित्रकला महास्पर्धेतील विजेत्यांनी आपली कल्पकता चित्रांच्या माध्यमातून साकारली आहे. मुलांमध्ये कल्पकता येण्यामध्ये पालक आणि शिक्षकांची भूमिकादेखील तेवढीच महत्त्वाची आहे. ‘गोवन वार्ता’ने अशा प्रकारचा अंक प्रकाशित करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. येथे काही मुलांनी बेडकाचे चित्र काढले आहे. निसर्गातील समतोल राखण्यासाठी हेदेखील तितकेच आवश्यक आहे.
मी स्पर्धेत भाग घेतलेल्या आणि विजेते ठरलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो. ‘गोवन वार्ता’ने लहान मुलांना व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या अंकाच्या माध्यमातून ‘गोवन वार्ता’ दरवर्षी लहान मुलांची कल्पकता सर्वांच्या समोर आणत आहे. याबद्दल मी त्यांचेदेखील अभिनंदन करतो. गोव्यातील जास्तीत जास्त मुलांनी अशा पद्धतीच्या उपक्रमात भाग घेणे आवश्यक आहे. शिक्षण खात्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहचेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


पुस्तक मुलांना विचार करायला शिकवते : प्रा. अनिल सामंत
प्रा. अनिल सामंत म्हणाले की, सध्या ‘एआय’ हा एकप्रकारे राक्षसाप्रमाणे आपल्यासमोर उभा आहे. यामुळे लहान मुलांच्या कल्पनाशक्ती, सृजनशीलता, संवेदनशीलतेवर परिणाम होणार आहे. यावर चित्र, गाणी किंवा खेळ आणि पुस्तके हे एक उत्तर आहे. ‘गोवन वार्ता’तर्फे ‘हुप्पा हुय्या’ बाल विशेषांकाचे प्रकाशन, तसेच राज्यस्तरीय महाचित्रकला स्पर्धेचे आयोजन हेदेखील यावर एक उत्तर आहे. पालकांनी मुलांना चित्र, गाणी, खेळ अशा माध्यमांचा वापर करू दिला पाहिजे. शिक्षक, पालकांनी केवळ उपदेश देणे सोडून द्यावे. त्यांनी मुलांना खेळू द्यावे, त्यांच्या हाती कुंचला द्यावा, त्यांना रंगात भिजू द्यावे, त्यांना पुस्तके वाचू द्यावे. यामध्येही मी पुस्तकांना अधिक महत्त्व देतो. पालकांनी मुलांना त्यांच्या समस्या विचारल्यास मुले आपल्याला शाळेत काय शिकवले जाते हे समजत नाही, असे सांगतील. दुसरी समस्या म्हणजे शिकवलेले परीक्षेपर्यंत लक्षात रहात नाही. आणि तिसरी समस्या म्हणजे अभ्यासात लक्ष केंद्रित होत नाही.
सध्याच्या नवीन शिक्षण पद्धतीत या समस्यांची उत्तरे आहेत. ही पद्धती भारतीय केंद्रित मेंदू शास्त्रावर आधारित आहे. मुलांना कल्पक उपक्रम दिले तर त्यांच्या मेंदूचा चांगला विकास होतो. चित्र काढणे अथवा पुस्तक वाचल्याने त्यांच्यातील कल्पकता जागृत होऊन ते त्या गोष्टीचा अनुभव घेतात. मोबाईल हे कधीही पुस्तकांना पर्याय होऊ शकणार नाहीत. मुलांना मोबाईल दिल्यावर त्यांना केवळ माहिती मिळते असे नाही. याचसोबत इंटरनेट विश्वातील हजारो घाणेरडे अॅप त्यांच्या हातात पोहोचले आहेत. याउलट पुस्तक मुलांना विचार करायला, त्यांच्यातील संवेदनशीलता जागृत करण्यास शिकवते.

...आणि दुर्वा दैकर भेटली जिल्हाधिकाऱ्यांना
कार्यक्रमादरम्यान काणकोण तालुक्यातील बाल चित्रकला महास्पर्धेतील विजेती इयत्ता पहिलीतील दुर्वा दुर्गेश दैकर हिला मुख्यमंत्र्यांनी ‘मोठी झाल्यावर कोण होणार,’ असे विचारले. यावेळी तिने आपल्याला जिल्हाधिकारी व्हायचे असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तिला लगेच उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले. जिल्हाधिकारी अंकित यादव यांनीदेखील तिचे स्वागत करून तिची विचारपूस केली. जिल्हाधिकारी होण्यासाठी शालेय शिक्षण, पदवी पूर्ण करून स्पर्धा परीक्षा करण्याचा सल्ला त्यांनी दुर्वाला दिला. त्यांनी दुर्वाला काही वेळ आपल्या खुर्चीत बसण्याची संधीदेखील दिली.