सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक

अमित शहा, राजनाथ सिंह, जयशंकर, डोभाल यांची उपस्थिती


2 hours ago
सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक

दिल्ली कार स्फोटातील जखमीची विचारपूस करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. दिल्ली लाल किल्ल्यावर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ही बैठक बोलावली होती.
ऑपरेशन सिंदूरच्या आधीही पंतप्रधान मोदींनी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत दिल्ली लाल किल्ल्यानजीक झालेल्या बॉम्बस्फोटावर चर्चा झाली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतली होती. बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावरून परतले. विमानतळावरून त्यांनी थेट एलएनजेपी रुग्णालय गाठले. तेथे त्यांनी लाल किल्ला स्फोटातील पीडितांची भेट घेतली. हॉस्पिटलमधील डॉक्टरांसोबत त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्लाच : केंद्रीय मंत्रिमंडळ
केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीतील लाल किल्ल्याच्या जवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार स्फोटाचा बुधवारी निषेध केला. मंत्रिमंडळाने या स्फोटाला ‘भयंकर दहशतवादी घटना’ असेही म्हटले आहे. याबरोबरच या घटनेचे गुन्हेगार, त्यांचे साथीदार आणि त्यांच्या प्रायोजकांना न्याय व्यवस्थेसमोर आणण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाने या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करणारा ठराव मंजूर केला आणि पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळले.

हेही वाचा