काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांची मागणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नोकरीसाठी पैसे दिल्याच्या प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिने ज्या मंत्र्याची व अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत, त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करा आणि या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केली. पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व मीडिया चेअरमन अमरनाथ पणजीकर उपस्थित होते. खेरा म्हणाले की, गेल्या साडेतीन वर्षांत केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्था येथे भाजप सत्तेत असूनही गोव्यात बेरोजगारी विक्रमी पातळीवर गेली आहे. भाजपने २०१७ मध्ये ५० हजार, तर २०२२ मध्ये १० हजार नोकर्या देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले नाही. सरकारी पदे विक्रीस काढली. पूजा नाईक हिच्या जबाबात ज्यांची नावे आहेत, ते मंत्री आणि अधिकारी यांच्यावर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करावी. या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली न्यायिक आयोगाने करावी, तसेच २०१९ पासून झालेल्या सर्व सरकारी भरतीचे लेखापरीक्षण करून श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी.
गाेव्यातील नोकरीसाठी पैसे घेण्याचा विषय काँग्रेस संसदेत मांडणार आहे. या प्रकरणात ५०० ते ६०० कोटींचा गैरव्यवहार झालेला आहे. तरीही ईडी निष्क्रिय आहे. ईडी फक्त भाजप विरोधकांवर कारवाई करत आहे.
_ अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस