जिल्हा पंचायत अधिसूचना दोन दिवसांत

निर्वाचन अधिकारी बदलले : रविवारी प्रशिक्षण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th November, 10:46 pm
जिल्हा पंचायत अधिसूचना दोन दिवसांत

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुका ठरल्याप्रमाणे १३ डिसेंबरलाच होतील, हे आता निश्चित झाले आहे. या निवडणुकांसाठी लागणारे निर्वाचन आणि सहाय्यक निर्वाचन अधिकारी नव्याने नियुक्त करण्यात आले असून, पूर्वीच्या अधिकाऱ्यांना या कामातून मुक्त केले आहे. रविवारी (१६ नोव्हेंबर) नव्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, त्यानंतर दोन दिवसांत आचारसंहिता लागू होणार आहे.

१० सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात तालुक्यांतील उपजिल्हाधिकाऱ्यांना निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्त केले होते, तसेच मामलेदारांना सहाय्यक निर्वाचन अधिकारी नेमले होते. हे अधिकारी आता मतदार याद्यांच्या पडताळणीच्या कामाला नियुक्त केल्यामुळे जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलली जाईल अशी चर्चा होती. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारला पत्रही लिहिले होते. मात्र, सरकारने ठरल्या तारखेलाच निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे.

सोमवार-मंगळवारपर्यंत आचारसंहिता

राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी नव्याने निर्वाचन अधिकारी नियुक्त केले. या यादीत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जागी उपसंचालक स्तरावरील (ज्यात वेगवेगळ्या खात्याचे उपसंचालक, सहायक आयुक्त आहेत) अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे. तर सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून ‘बीडीओं’ना नियुक्त केले आहे. या सर्व अधिकाऱ्यांना रविवारी १६ नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण दिले जाईल. अर्ज स्वीकारणे, छाननी करणे या साऱ्या गोष्टींचे प्रशिक्षण दिल्यानंतर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे.

निवडणूक पुढे ढकलण्याचा विचार नाही

निवडणूक पुढे ढकलण्याचा विचार नाही. निवडणुकीची तयारी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होती. मतदार याद्याही तयार होत्या. त्यानंतर गोव्यासह काही राज्यांमध्ये मतदार याद्यांची पडताळणी सुरू करण्याचा निर्णय भारतीय निवडणूक आयोगाने घेतला. पण राज्य निवडणूक आयोगाने या गोष्टीचा गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट केले.

पक्षांची उमेदवार शोध मोहीम : सध्या भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजीपी, मगो, आम आदमी पक्ष या सर्वांनीच जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्याचे काम सुरू केले आहे. भाजपने आपली यादी जवळजवळ निश्चित केली आहे. अन्य पक्षांनीही उमेदवार शोधण्याचे काम सुरू केले आहे.

५० मतदारसंघांसाठी होणार निवडणुका

१) राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख १४ ऑक्टोबर रोजी जाहीर केली होती आणि २९ ऑक्टोबर रोजी प्रकाशित केलेली मतदार यादी स्वीकारली आहे.

२) मात्र, निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर व्हायचे आहे. ज्या दिवशी जिल्हा पंचायत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल, त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होणार आहे.

३) उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आणि मतमोजणीची तारीखही तेव्हाच स्पष्ट होईल. शनिवार, १३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. उत्तर गोव्यात २५ तर दक्षिण गोव्यात २५ मतदारसंघ आहेत.

आरक्षणाचा दिग्गजांना बसणार फटका

निवडणुकीसाठी आरक्षणही जाहीर झाले असून, रोटेशनप्रमाणे झालेल्या आरक्षणामुळे जिल्हा पंचायतीवर निवडून येणाऱ्या अनेक दिग्गजांचे मतदारसंघ त्यांच्या हातून निसटले आहेत. त्यामुळे यावेळी नवे चेहरे मोठ्या प्रमाणात निवडून येतील.

#GOA #ZPELECTIONS #GOAPOLITICS #GOANEWS #PANAJI