भाजप मुख्यालयात बिहार विजयाचा जल्लोष

भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना मफलर फिरवून अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी भाजप मुख्यालयात विजयी सभा घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मफलर फिरवत कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनीही मफलर दाखवली. यावेळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, बिहारच्या लोकांनी खळबळ उडवून दिली आहे. आता ‘कट्टा सरकार’ कधीही परत येणार नाही. जे लोक छठपूजेला नाटक म्हणू शकतात, ते बिहारचा आदर कसा करतील ?
पंतप्रधान मोदी म्हणाले...
भाजपची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्ता एखाद्या गोष्टीसाठी मन लावतो, तेव्हा काहीही अशक्य नाही.
आजच्या विजयाने केरळ, तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांमध्येही नवीन ऊर्जा निर्माण केली आहे.
बिहारने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे.
यावेळी बिहारमध्ये पुनर्मतदान झाले नाही. मतदान शांततेत झाले. निवडणूक आयोग, सुरक्षा दल आणि बिहारमधील जागरूक मतदारांनी कौतुकास्पद काम केले.
भारताच्या लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांचा हा विजय आहे. या निवडणुकीमुळे भारतीय निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.