तरुणांना सहकार क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करा !

सहकारमंत्र्यांचे आवाहन : पणजीत ७२ व्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाचे उद्घाटन


16 mins ago
तरुणांना सहकार क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करा !

सहकार सप्ताह सोहळ्यात बोलताना सहकारमंत्री सुभाष शिरोडकर. सोबत इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील तरुण पिढीला सहकार, कृषी क्षेत्रांत गुंतवण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी पणजीत ७२ व्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खात्याचे सचिव यंतीद्र मरळकर, सहकार निबंधक आशुतोष आपटे, नाबार्डचे संदीप धारकर, सतीश मराठे, शरद गांगल आदी उपस्थित होते.
मंत्री शिरोडकर पुढे म्हणाले की, गोव्यात सहकाराची पाळेमुळे ४०० ते ५०० वर्षांपूर्वीच रुजली होती. त्यावेळीच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खाजन शेती सुरू केली. समिती स्थापन करून सामूहिक शेतीचे प्रयोग केले. आज राज्यात मोठी सहकार चळवळ उभी राहिली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. आम्हाला एका वर्षात २०० सहकारी संस्था निर्माण करायच्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सहकाराबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
राज्यात सुमारे चार लाख विद्यार्थी आहेत. त्यांना आवश्यक असणारे शालेय साहित्य सहकाराच्या माध्यमातून विकता येऊ शकते. आमच्या शिक्षण संस्थेत आम्ही हाच प्रयोग १९७१ मध्ये यशस्वी करून दाखवला होता. गोव्यातील समाज शिक्षित आहे. येथे शिक्षण, आरोग्य, सहकारासह सर्व क्षेत्रांत आदर्श तयार करणे शक्य आहे. यासाठी खात्यातील अधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण समाजात राहत असून समाजातील देणे लागतो, हे समजून घेणे आवश्यक असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
‘माशेल महिला’ पुनरुज्जीवित करणार
मंत्री शिरोडकर म्हणाले की, माशेल महिला सहकारी बँकेबाबत सध्या चौकशी सुरू आहे. ही बँक पुनरुज्जीवित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एप्रिल २०२६ पर्यंत राज्यातील सर्व संस्थांचे डिजिटायझेशन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
एक हजार हेक्टर जमीन लागवडीखाली
राज्यात सहकार आणि शेतीचा जुना संबंध आहे. राज्यातील एक हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही जलस्रोत खात्यातर्फे आवश्यक पाणी देण्यासाठी तयार आहोत. ‘नाबार्ड’सारख्या बँकांनी यामध्ये आमची मदत करावी, असे आवाहनही मंत्री शिरोडकर यांनी केले.               

हेही वाचा