वीज मीटर स्थलांतरासाठी १० हजार ग्राहकांचे अर्ज दाखल

मुदत संपल्यास जोडणी तोडण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th November, 10:38 pm
वीज मीटर स्थलांतरासाठी १० हजार ग्राहकांचे अर्ज दाखल

पणजी : वीज खात्याने घरांच्या आत किंवा रीडिंग घेणे अवघड असणाऱ्या जागांवरील वीज मीटर, सहज रीडिंग घेता येईल अशा जागी हलविण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी ग्राहकांना २८ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून, राज्यभरातील ४० हजार अशा मीटरपैकी १० हजार मीटर हलवण्यासाठी ग्राहकांचे अर्ज आले आहेत.

सध्या मीटर हलवण्याच्या प्रक्रियेला मध्यम स्वरूपाचा प्रतिसाद मिळत आहे. १० हजार ग्राहकांचे अर्ज आले असून, त्यांचे मीटर हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम मुदतीपर्यंत ३० हजार मीटर हलवली जातील अशी अपेक्षा खात्यातर्फे केली जात आहे. ग्राहक स्वतःहून पुढे येऊन याची प्रक्रिया जाणून घेत आहेत. खात्याने हा निर्णय संयुक्त वीज नियमन प्राधिकरणाच्या नियमांनुसार घेतला आहे. खात्याचे कर्मचारी ग्राहकांना प्रकिया समजावून सांगत असून, दर महिन्याला नोटीसही प्रसिद्ध करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात ७.४५ लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. यातील सुमारे ४० हजार ग्राहकांची मीटर घरामध्ये अथवा सहजपणे मीटर रीडिंग करता येणार नाही अशा जागी बसवण्यात आली आहेत. यातील काही ग्राहकांचे घर गोव्यात असले तरी ते सध्या येथे राहत नाहीत. घर बंद असल्याने किंवा मीटर आत असल्याने खात्याच्या कर्मचाऱ्यांना रीडिंग घेता येत नाही. अशावेळी मागील बिलांची सरासरी काढून वीज बिल तयार करावे लागते. यामध्ये वीज खात्याचे नुकसान होत आहे.

अंतिम निर्णय सरकार घेणार

खात्याने दिलेल्या मुदतीत वीज मीटर स्थलांतर न केल्यास त्या ग्राहकाची वीज जोडणी बंद करण्यात येणार आहे. वीज जोडणी कायमस्वरूपी बंद झाली तर पुन्हा सर्व प्रक्रिया करून नव्याने जोडणी घ्यावी लागणार आहे. यासाठीची मुदत संपण्यास मोजकेच दिवस शिल्लक आहेत. असे असले तरी, वीज जोडणी बंद करण्याबाबत अंतिम निर्णय सरकार घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

#GOA #ELECTRICITY #GOANEWS #POWER #PANJIM