केंद्रीयमंत्री एल. मुरुगन यांची माहिती : उद्घाटन सोहळा खुल्या आवारात रंगणार

पणजी : राज्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५६ व्या ‘इफ्फी’साठी आतापर्यंत ७५०० प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. यंदाच्या महोत्सवात १२७ देशांमधून आलेल्या प्रवेशिकांपैकी ८४ देशांचे २७० चित्रपट दाखवण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी शनिवारी पणजीत दिली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खात्याच्या संचालक स्मिता शर्मा, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम आदी उपस्थित होते. इफ्फीमध्ये दरवर्षी नवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न असतो, याच हेतूने यंदा उद्घाटन सोहळा खुल्या आवारात होणार असून, त्यात ३४ चित्ररथांची मिरवणूक पाहण्यास मिळेल. यंदा इफ्फीची सुरुवात ब्राझिलियन चित्रपट ‘दी ब्ल्यू ट्रेल’ने होणार असल्याचे मंत्री मुरुगन यांनी सांगितले.
कंट्री फोकसमध्ये जपानमहोत्सवात ‘कंट्री फोकस’ विभागात जपानमधील चित्रपट दाखवले जातील. तसेच स्पेन आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील चित्रपटांचे विशेष प्रदर्शन होणार आहे. महोत्सवातील विशेष विभागात ५० महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे प्रदर्शन होईल, अशी माहितीही मुरुगन यांनी दिली.
समारोप सोहळ्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत आणि बाळकृष्णन यांचा विशेष सत्कार होणार आहे. यंदाही ‘७५ क्रिएटिव्ह माईंड ऑफ टुमारो’ विभागाद्वारे १२४ तरुण कलाकारांना संधी देण्यात येईल. यंदा ‘एआय’ चित्रपटांसाठी देखील विशेष स्पर्धा विभाग असणार आहे. याशिवाय ‘फिल्म बाजार’ उपक्रम देखील राबविण्यात येईल. समारोप सोहळ्यात जीवनगौरव तसेच यावर्षीच्या भारतीय चित्रपट कलाकार पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात येईल, असे मंत्री मुरुगन यांनी सांगितले.
‘क्लाउडिया’, ‘दी पायलट’ गोमंतकीय चित्रपटांची निवडइफ्फीमध्ये ‘क्लाउडिया’ आणि ‘दी पायलट’ या दोन गोमंतकीय चित्रपटांची निवड झाली आहे. ‘विशेष गोवा’ विभागात १७ चित्रपट आले होते, यातील तीन चित्रपटांना पुरस्कार देण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या चित्ररथ मिरवणुकीत १२ गोमंतकीय तर ११ चित्रपट सृष्टीशी संबंधित चित्ररथ असतील. त्याशिवाय आकाश कंदील स्पर्धेसाठी प्रत्येक तालुक्यातून तीन विजेते निवडण्यात येतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
‘आसेसांव’च्या निवडीसाठी प्रयत्न सुरू : मुख्यमंत्री१) गोव्यातील चित्रपट इफ्फीतील ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात यावा असे आम्हालाही वाटते. कोकणी भाषेवर आमचेही प्रेम आहे.
२) ‘आसेसांव’ चित्रपट इफ्फीत निवडला जावा यासाठी आमच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
३) २८ रोजी पंतप्रधान गोव्यात येणार असले तरी समारोप सोहळा वेळेत सुरू होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.