हेल्मेट न घालणाऱ्या ४,८७४ जणांवर कारवाई

पणजी : राज्यात १ जानेवारी २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक खात्याने ६,७३४ वाहन चालकांचे परवाने निलंबित केले. यात सर्वाधिक ४,८७४ चालकांवर हेल्मेट परिधान न केल्यामुळे, तर ५३४ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
देशातील वाढत्या रस्ता अपघातांची आणि त्यातील मृत्यूंच्या संख्येची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली आहे. या समितीने अपघात, रस्त्यांची बांधणी तसेच अपघाती मृत्यू व इतर संबंधित विषयांचा अभ्यास करून अहवाल तयार केला आणि राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. समितीने मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या कलम २१ नुसार, वाहतूक नियम न पाळणाऱ्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची शिफारस सर्व राज्यांना व संघ प्रदेशांना केली होती.
या मार्गदर्शक तत्त्वानुसार, अतिवेगाने वाहन चालविणे, जंक्शन जवळील वाहतूक सिग्नलचे पालन न करणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, दारू पिऊन गाडी चालविणे आणि गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, या वाहतूक नियमांसाठी चालकांचे परवाने कमीतकमी तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद केली आहे.
समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दारू पिऊन गाडी चालविल्याप्रकरणी वाहन चालकाचा परवाना निलंबित करण्याचा अधिकार प्रथमवर्ग न्यायालयाला दिला आहे. तर वरील इतर नियम उल्लंघनासाठी संबंधित वाहतूक खात्याला अधिकार दिले आहेत. अहवाल मिळाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला न्यायालयात किंवा वाहतूक खात्यात हजर राहण्यास समन्स काढले जातात. त्यानंतर या प्रकरणी रीतसर सुनावणी घेऊन, दोषी आढळल्यास चालकाचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले जातात.
वाहतूक खात्याने नऊ महिन्यांत एकूण ६,७३४ जणांचे वाहन परवाने निलंबित केले आहेत. त्यात सर्वाधिक हेल्मेट परिधान न केल्यामुळे ४,८७४, अतिवेगाने वाहन चालवल्यामुळे ३५५, मोबाईलचा वापर केल्यामुळे ४८९, दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे ५३४, वाहतूक सिग्नलचे पालन न केल्यामुळे १३०, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक केल्यामुळे २७, निष्काळजीपणामुळे वाहन चालवून अपघात केल्यामुळे ७, दुचाकीच्या मागे दोन किंवा त्याहून जास्त जणांची वाहतूक केल्यामुळे १८० आणि सिट बेल्ट न घातल्यामुळे १३८ जणांचा समावेश आहे.