स्वच्छ राजकारणासाठी समविचारींनी एकत्र यावे!

युरी आलेमाव यांची हाक : कुंकळ्ळी येथे आलेमाव यांचा वाढदिन उत्साहात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
स्वच्छ राजकारणासाठी समविचारींनी एकत्र यावे!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या वाढदिनानिमित्त कुंकळ्ळी येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजीपीचे नेते एकत्र आले.


मडगाव : गोमंतकीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवी सुरुवात करावी लागेल आणि गोव्याची पुन्हा बांधणी करावी लागेल. स्वच्छ राजकारणासाठी सर्व समविचारी लोकांनी एकत्र येऊन गोव्यातील निवडणूक जिंकण्याची गरज आहे. सर्व विरोधी पक्षांचे यावर एकमत झाल्यास भाजपची झोप उडेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.

कुंकळ्ळी येथे युरी आलेमाव यांच्या वाढदिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गिरीश चोडणकर, आमदार विजय सरदेसाई, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर, आरजीपी प्रमुख मनोज परब, एम. के. शेख, काँग्रेस गट अध्यक्ष आणि इतर उपस्थित होते.

युरी आलेमाव म्हणाले की, गोवा खूप मौल्यवान आहे. इथल्या पर्यावरणाचे रक्षण आपल्याला करावे लागेल. सामाजिक वातावरणाचे संगोपन करून तरुणांसाठी संधी निर्माण कराव्या लागतील. मी राजकारणात बराच संघर्ष केला. यशापेक्षा जास्त अपयशाने शिकवले आहे. सांगे हे माझ्या राजकीय प्रवासातील ‘स्टार्ट अप’ होते. गोमंतकीयांनी २०२७ मध्ये द्वेष, भ्रष्टाचार, भरती घोटाळे अशा अनिष्ट शक्तींचा नायनाट करण्यासाठी बदल घडवून आणावा.

मनोज परब यांनी आलेमाव यांचे कौतुक करताना सांगितले की, ते संपूर्ण गोव्यातील प्रश्न उपस्थित करतात. विधानसभा अधिवेशनातील त्यांची कामगिरी स्पृहणीय आहे.

अमित पाटकर म्हणाले की, युरी आलेमाव हे प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करतात आणि त्यानंतरच ते विविध व्यासपीठांवर मांडतात. आपल्याला भाजपला पराभूत करायचे असेल, तर आपल्याला युरी आलेमाव यांचे नेतृत्व आवश्यक आहे. गिरीश चोडणकर, विजय सरदेसाई यांनीही युरी आलेमाव यांच्या कार्याचा यावेळी गौरव केला. युरी आलेमाव यांचे ​समर्थक, हितचिंतक मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते म्हणून स्वत:ला सिद्ध केले!

आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, आमचे राजकीय मतभेद असू शकतात, परंतु गोव्याच्या हितासाठी आपण एकत्र आहोत. युरी हे अनेक मुद्द्यांवर चर्चा करतात आणि ते इतरांचे ऐकतात. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. लोकांना एकता हवी आहे आणि आपल्याला ती टिकवून ठेवण्याची गरज आहे.