भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी आजपासून ईडन गार्डन्सवर

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना शुक्रवार, १४ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय संघाच्या प्लेइंग ११ संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघाचा साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन दोएशहाते यांनी बुधवारी सांगितले की, ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत या दोघांनाही वगळणे शक्य नाही. त्यामुळे दोघेही कोलकात्यात पहिल्या कसोटीत खेळणार आहेत. मात्र, यष्टिरक्षणाची जबाबदारी पंत सांभाळेल, तर जुरेलला केवळ फलंदाज म्हणून संधी मिळेल.
अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला पहिल्या कसोटीसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले असून तो आता दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध भारत ‘अ’ तर्फे एकदिवसीय सामने खेळणार आहे.
बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, नितीशला दुखापत नाही, पण सध्याच्या संघरचनेत त्याला स्थान मिळण्याची शक्यता नव्हती. तो दुसऱ्या कसोटीसाठी पुन्हा संघात सामील होईल.
दरम्यान, ध्रुव जुरेलचा फॉर्म निवडीमागील मोठा घटक ठरला आहे. गेल्या सहा महिन्यांत जुरेलने सलग चार शतके ठोकली असून, अलीकडेच दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावांत शतके झळकावली होती.
दोएशहाते म्हणाले, जुरेलने सातत्यपूर्ण कामगिरी करून आपले स्थान निश्चित केले आहे. इतक्या उत्कृष्ट लयीत असलेल्या खेळाडूकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्यामुळे आम्ही पंत आणि जुरेल दोघांनाही संधी देत आहोत.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, नितीशबाबत आमचा दृष्टिकोन बदललेला नाही. मात्र, हा सामना जिंकण्यासाठी आम्हाला संतुलित संघ उतरवावा लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या परिस्थितीचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. ऋषभ पंत तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीनंतर तो पूर्ण तंदुरुस्त झाला आहे. प्रशिक्षक मंडळाने स्पष्ट केले की, पंत फिट नसता, तर आम्ही त्याला त्वरित कसोटीत उतरवले नसते. त्यामुळे विकेटकीपिंगची जबाबदारी त्याच्याकडेच असेल.
ईडन गार्डन्सवरील खेळपट्टी तिसऱ्या दिवसानंतर फिरकीला साथ देईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भारताकडून रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या तिघा फिरकीपटूंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
रायन टेन दोएशहाते म्हणाले, वॉशिंग्टन, अक्षर आणि जडेजा हे अष्टपैलू फलंदाज असून त्यांच्या उपस्थितीमुळे संघ संतुलित राहतो.
दक्षिण आफ्रिकेच्या संघातही केशव महाराज, सायमन हार्मर आणि सेनुरन मुथुसामी हे दर्जेदार फिरकीपटू आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
गेल्या वर्षी न्यूझीलंडने आमच्या फलंदाजांना फिरकीने त्रास दिला होता. या वेळी आमचे खेळाडू त्यातून धडा घेतलेले असतील, अशी अपेक्षा आहे, असे दोएशहाते यांनी सांगितले.
आजचा सामना
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
वेळ : सकाळी ९.३० वा.
स्थळ : इडन गार्डन्स, कोलकाता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ सिनेमा आणि डिस्नी+ हॉटस्टार
भारत : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम, टोनी डी जिओर्गी, ट्रिस्टन स्टब्स, टेंबा बावुमा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, काइल वेरेन (यष्टीरक्षक), सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज, मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा.
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ईडन गार्डन्सवर कडक सुरक्षा व्यवस्था
सोमवारी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, कोलकाता पोलिसांनी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ईडन गार्डन्स आणि टीम हॉटेल्सभोवती कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सर्व प्रमुख प्रवेश आणि निर्गमन बिंदूंवर तपासणी वाढवण्यात आली आहे.