अर्जुन एरिगेसीची अरोनियनवर मात

फिडे विश्वचषक २०२५ : क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
अर्जुन एरिगेसीची अरोनियनवर मात

पणजी : भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने अप्रतिम खेळ करत ग्रँडमास्टर लेव्हॉन अरोनियन याचा ड्रॉचा डाव स्वीकारण्यास नकार दिला आणि काळ्या मोहरांनी विजय पटकावत फिडे विश्वचषक २०२५ च्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. दुसरीकडे भारतीय खेळाडू पी. हरिकृष्णा याला पुढे जाण्यासाठी टायब्रेक खेळावा लागणार आहे.
पहिल्या डावात पांढऱ्या मोहरांनी ड्रॉ खेळल्यानंतर, अर्जुनने दुसऱ्या डावात अरोनियनच्या किंगला कोपऱ्यात पिन केले आणि ३८व्या चालीत दोन वेळा विश्व कप जिंकलेल्या अरोनियनला पराभव स्वीकारावा लागला. क्वीन–बिशप–नाइटच्या त्रिआघाती हल्ल्यातून (ट्रिपल अटॅक) अर्जुनने सामना जिंकला.
सामन्यानंतर अर्जुन म्हणाला, मधला खेळ खूप तणावाचा होता. मी खरेच जिंकण्याच्या स्थितीत आहे की नाही याची खात्री नव्हती. पण जेव्हा त्यांनी ए-ई३ खेळले आणि ड्रॉची ऑफर दिली, तेव्हा मला जाणवले की विजय शक्य आहे. आता अर्जुनचा सामना चीनच्या जीएम वेई यी आणि अमेरिकेच्या जीएम सॅमुअल सेवियन यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
जीएम वेई यी (चीन) याने जीएम सॅमुअल सेवियन (अमेरिका) याचा ७३ चालींत हरवत पुढील फेरी गाठली. जीएम नोडिरबेक याकुब्बोव (उझबेकिस्तान) याने जीएम गॅब्रिएल सरगिसियन (आर्मेनिया) यांना ३५ चालींत हरवले. जीएम सिंडारोव जावोखिर (उझबेकिस्तान) याने जीएम स्वेन फ्रेडरिक (जर्मनी) याला ४७ चालींत नमवले. पी. हरिकृष्णासह उर्वरित तीन सामने टायब्रेकमध्ये गेले.
हरिकृष्णाचे आव्हान कायम
पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना हरिकृष्णाने वरचढीचा प्रयत्न केला, मात्र जोस एडुआर्डो मार्टिनेज अलकांतारा याने भक्कम बचाव ठेवला. ३५ चालींत विजयाची कोणतीच शक्यता नसल्याने सामना ड्रॉ झाला.
भारतीय खेळाडूंचा निकाल (राउंड ५, गेम २)
जीएम लेव्हॉन अरोनियन-अर्जुन एरिगैसीकडून पराभूत : एकूण गुणफलक : ०.५ –१.५
जीएम पी. हरिकृष्णा-जोस एडुआर्डो मार्टिनेज अलकांतारा सामना ड्रॉ : एकूण गुणफलक : १ -1