आज चौथा टी-२० सामना : मालिकेत १-१ ची बरोबरी

क्वीन्सलँड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (दि. ६) क्वीन्सलँड येथील कॅरारा ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. सध्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. त्यामुळे, चौथा टी-२० सामना जिंकून मालिकेत निर्णायक आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
विशेष म्हणजे, क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाने अद्यापपर्यंत कोणत्याही फॉरमॅटमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. या मैदानावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ दोनच सामने खेळले गेले आहेत. यापैकी एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. या मैदानावर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२२ मध्ये एक सामना खेळला होता, ज्यात वेस्ट इंडिजला ३ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता.
भारताला आघाडी घेण्याची संधी
ऑस्ट्रेलियाचे अनेक प्रमुख खेळाडू या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करेल. मागील सामन्यात जोश हेजलवुड नसल्यामुळे स्पष्ट फरक दिसून आला होता आणि भारताने १८६ धावांचे लक्ष्य गाठून मालिकेत बरोबरी साधली होती. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ट्रॅव्हिस हेडची उणीवही भासेल, कारण सलामीवीर हेड अॅशेसच्या तयारीसाठी शेफील्ड शील्डमध्ये खेळायला गेला आहे. या दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत, गाबा येथे होणाऱ्या शेवटच्या सामन्यापूर्वी २-१ अशी आघाडी घेण्याची भारताला ही सर्वोत्तम संधी आहे.
हेडच्या अनुपस्थितीत शॉर्टला संधी
हेडच्या अनुपस्थितीत कर्णधार मिचेल मार्श मॅथ्यू शॉर्टला सलामीवीर म्हणून संधी देऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचा संघ त्यांची आक्रमक फलंदाजी कर्णधार मिचेल मार्श आणि टिम डेव्हिड यांच्यावर अवलंबून राहील.सीन अॅबॉटने अपेक्षेनुसार कामगिरी न केल्याने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या गोलंदाजी विभागात बदल करावे लागतील आणि बेन ड्वारशुईस किंवा महली बियर्डमॅन यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
गिलच्या फॉर्मबद्दल चिंता
भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलचा फॉर्म. त्याने ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या दौऱ्यात आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, पण त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. एकदिवसीय मालिकेच्या सुरुवातीपासून त्याचे स्कोअर १०, ९, २४, नाबाद ३७, ५ आणि १५ असे आहेत. त्याला फुल लेंथच्या आणि थोडा बाऊन्स असलेल्या चेंडूंवर संघर्ष करावा लागत आहे. आगामी काळात लाल चेंडूने खेळायला सुरुवात करण्यापूर्वी त्याने धावा केल्यास त्याचा आत्मविश्वास वाढेल.
अभिषेकची चमकदार कामगिरी, सूर्याकडून मोठ्या अपेक्षा
अभिषेक शर्माने जागतिक क्रमवारीत नंबर एक टी-२० फलंदाज म्हणून आपली ख्याती सिद्ध केली आहे आणि संघ त्याच्याकडून पुन्हा एकदा जोरदार खेळीची अपेक्षा करत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात करून फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत, परंतु तो आता मोठी धावसंख्या उभारू इच्छितो.
भारताची मजबूत गोलंदाजी
अर्शदीप सिंग संघात आल्यामुळे गोलंदाजी विभाग अधिक मजबूत दिसत आहे. कुलदीप यादवला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी परत पाठवण्यात आले आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या उपस्थितीमुळे भारतीय फलंदाजी अधिक मजबूत दिसते. त्याने मागील सामन्यात २३ चेंडूत नाबाद ४९ धावांची महत्त्वाची खेळी करून भारताला विजय मिळवून देण्यात भूमिका बजावली होती.
दोन्ही संघांमधील ‘हेड-टू-हेड’ आकडेवारी
खेळलेले एकूण सामने : ३३
भारताने जिंकलेले सामने : २१
ऑस्ट्रेलियाने जिंकलेले सामने : १२
भारताची विजयी सरासरी : ६३.६ टक्के
ऑस्ट्रेलियाची विजयी सरासरी : ३६.४ टक्के
संभाव्य प्लेइंग - ११
भारत : शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, वाॅशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), मैथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), टिम डेविड, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, जेवियर बार्टलेट, बेन ड्वारशुइस, नाथन एलिस, मैथ्यू कुह्नमैन.