पीडित मुलीच्या उलटतपासणीत ती खोटी विधाने करत असल्याचे समोर

लैंगिक अत्याचार प्रकरणी युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24 mins ago
पीडित मुलीच्या उलटतपासणीत ती खोटी विधाने करत असल्याचे समोर

पणजी : लैंगिक अत्याचार प्रकरणातील १५ वर्षीय पीडित मुलीच्या उलटतपासणीत ती खोटी विधाने करत असल्याचे समोर आले आहे. तसेच मैत्रिणीच्या खून प्रकरणातून स्वतःला वाचविण्यासाठी संशयित युवकाविरोधात खोटी तक्रार दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण नोंदवून बाल न्यायालयाने २६ वर्षीय युवकाची लैंगिक अत्याचार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश बाल न्यायालयाचे अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी दिला.

वास्को पोलीस स्थानकाच्या परिसरात समुद्र किनाऱ्यावर १८ मे २०२२ रोजी १९ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता, तिचा खून करण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून १९ मे २०२२ रोजी २६ वर्षीय युवकाला अटक केली होती. याच दरम्यान संशयित युवकाची चौकशी केली असता, संशयिताने मृत मुलीच्या वस्तू १५ वर्षीय पीडित मुलीकडे दिल्याचे समोर आले. त्यानुसार, पीडित मुलीची खून प्रकरणात चौकशी करण्यात आली. तसेच तिच्याकडून मृत मुलीकडील वस्तू जप्त केल्या. याच दरम्यान १५ वर्षीय मुलीने वास्को पोलिसात २४ मे २०२२ रोजी तिच्यावर तिचा मित्र तथा वरील संशयिताने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, २०१९ ते २०२२ दरम्यान संशयित युवकाने तिच्याशी मैत्री केली. तसेच तिला धमकी देऊन आणि मारहाण करून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. तसेच गोव्याबाहेरही नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याची वाच्यता केल्यास तिला जीवे मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यानुसार, तत्कालीन महिला उपनिरीक्षक वर्षदा देसाई यांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून बाल न्यायालयात १२ जुलै २०२२ रोजी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने १ आॅगस्ट २०२२ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयित युवकातर्फे अॅड. एस. खोट यांनी बाजू मांडली. पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या खून प्रकरणात तिची चौकशी करण्यात आली होती. तसेच तिच्याकडून मैत्रिणीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. याच दरम्यान पीडित मुलीने खून प्रकरणातून स्वतःचा बचाव करण्यासाठी संशयिताविरोधात खोटी तक्रार दाखल केली. तसेच या प्रकरणात कोणत्याही वैद्यकीय तसेच इतर पुरावे सादर करण्यात आले नसल्याचा युक्तिवाद मांडला. या प्रकरणी बाल न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. 

हेही वाचा