वागातोर येथील घटना : तिघांना अटक

म्हापसा : मैत्रिणीवर अश्लील शेरेबाजी केल्यानंतर जाब विचारणाऱ्या दोन स्थानिक युवकांवर हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केल्याची घटना वागातोर येथे घडली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी एका रेस्टॉरन्टच्या तीन कामगारांना अटक केली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये एस. मौशील (२४, रा. कर्नाटक), सौरभ कोरंगा (२४, उत्तराखंड) व धरम उप्रेती (२८, अंधेरी, मुंबई) यांचा समावेश आहे. ते वागातोर येथील एका रेस्टॉरन्टचे कामगार आहेत.
ही घटना वागातोर येथील हॅलिपॅडवर मंगळवार, ११ रोजी सायंकाळी घडली. फिर्यादी रोहन पालयेकर (गिरी), त्याचा मित्र शुभम व एक मैत्रीण घटनास्थळी गप्पागोष्टी करत होते. तिथे संशयित आरोपी आले, त्यांनी फिर्यादींच्या मैत्रिणीला संबोधून अश्लील शेरेबाजी केली. यावरून फिर्यादी व त्याच्या मित्राने संशयितांना जाब विचारला असता त्यांनी फिर्यादी गटावर हल्ला चढवला आणि त्यांना लाथाबुक्के व दगडाने मारहाण केली. तसेच शुभम याच्या डोक्यावर दारुची बाटली फोडली. यात दोघेही जण गंभीर जखमी झाले.
नंतर संशयितांनी फिर्यादींच्या गळ्यातील १.३० लाखांची सोनसाखळी हिसकावून घेतली. याशिवाय कारची देखील मोडतोड केली.
याप्रकरणी पोलिसांनी भा.न्या.सं.च्या ७५(३), ३५२, ११८(२), १२५(अ) १३४, ३२४(५) व ३(५) कलमान्वये गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली. तिन्ही संशयितांना म्हापसा न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, संशयित आरोपी एस. मौशील हा सराईत गुन्हेगार असून बंगळुरू मधील इंदिरानगर पोलीस स्थानकात त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती हणजूण पोलिसांनी दिली.